'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:05 PM2023-09-15T12:05:06+5:302023-09-15T12:07:58+5:30
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांची ‘आपण बोलून निघून जायचं ..’ ही कविता व्हायरल झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटू लागले असून विरोधक देखील व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका करत आहे. याचदरम्यान आता मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांची ‘आपण बोलून निघून जायचं ..’ ही कविता व्हायरल झाली आहे. किशोर कदम यांनी या कवितेसह माइकचा फोटो शेअर केला आहे.
काय आहे किशोर कदम यांची कविता?
आपण बोलून निघून जायचं ..
होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं…
आपल्याला काय..
केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर
आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं
जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय…
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय…
लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती
आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं
लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..
चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत
खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं
कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..
रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं
आपल्याला काय ..
सौमित्र
किशोर कदम यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत त्यांच कौतुक केलं आहे. एका युजरने म्हटलं की, "वा किशोर… सगळ्यांच्या मनातल्या भावनेला तू नेमकेपणाने (आणि धीटपणे) काव्यातून व्यक्त करतोस!! स्वतःच्या बांधिलकीला आणि बंडखोरीला जागतोस!!". तर एकाने कमेंट केली की, "रोखठोक, बोचणारे वास्तव". आणखी एका युजरने म्हटले की, 'एका अग्रलेखाएवढी ताकद आहे तुमच्या कवितेमध्ये'. शिवाय, किशोर कदम हे नेहमीच सामजिक परिस्थितीवर रोखठोक भाष्य करत असतात. यापुर्वीही त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावरील टोलनाक्यावर पोस्ट केली होती. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली होती.
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023
सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे असे विधान केले. ते माध्यमांच्या कॅमेऱ्यात बंद झाले. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यामुळे सरकारच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.