"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 02:05 PM2024-11-07T14:05:24+5:302024-11-07T14:05:45+5:30
जकारणात सक्रिय झाल्यानंतर सयाजी शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या राज्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी कंबर कसली असून संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार रॅलीमध्ये अनेक सेलिब्रिटींना बोलवण्यात येत आहे. अलिकडेच दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सयाजी शिंदे यांच्या राजकीय प्रवेशानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सयाजी शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना राजकीय प्रवेशाबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, "मी राजकारणात आलेलं माझ्या चाहत्यांना आवडलेलं नाही. मला त्यांना हे सांगावंसं वाटतंय की लांबून बोलण्यापेक्षा आता मी प्रत्यक्षात बघतोय. निर्णय घेणं आणि खऱ्या गोष्टींपर्यंत पोहोचणं फार अवघड असतं. राजकारणामुळे अनेक नवी लोकं जोडली गेली आहेत. यामुळे मी जे झाडांसाठी काम करतो त्याला खूप मदत होईल".
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलही वक्तव्य केलं. "त्यादिवशी मी एके ठिकाणी गेलो होतो. तिथे एका महिलेला मी लाडकी बहीण योजनेबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी आनंदाने लाडक्या बहिणीचे पैसे आले असं सांगितलं. मग त्यांनी मला तुम्ही राजकारणात आहात ना, मग लाडकी बहीण योजना बंद होणारे का असं विचारलं. त्यावर मी त्यांना म्हटलं की असं काही होणार नाही. लोकांना उगाच ही भीती दाखवली जात आहे. पण मला विश्वास आहे की लाडकी बहीण योजना सुरू राहील. लोकांचेच पैसे लोकांना मिळत आहे. त्यामुळे दुर्बल लोकांना याचा फायदा होत आहे. त्यामुळे याचा निवडणुकीला आणि मतदानात फायदा होईल", असं ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत सयाजी शिंदे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ते स्टार प्रचारक असणार आहेत. त्यांच्याबरोबर अभिनेता भाऊ कदमही राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे.