राज्याच्या राजकीय परिस्थितीवर नितीन गडकरींचं परखड मत...; कोणाला धरलं जबाबदार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:36 AM2023-07-05T10:36:34+5:302023-07-05T10:38:27+5:30
तुम्ही कुठल्याही पक्षाच्या विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल पण तुम्ही विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे असं गडकरींनी सांगितले.
मुंबई – राज्याच्या राजकारणात गेल्या पंचवार्षिक काळात बऱ्याच उलथापालथी झाल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवली. त्यानंतर युतीला जनतेचे बहुमत आल्यानंतर संख्याबळ पाहता मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षात बिनसलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. राज्यात मविआ सरकार स्थापन झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार फुटले आणि राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेना सरकार आले. आता अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी परखड मत व्यक्त करत या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळलाय असं विधान केले.
नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय परंपरा ही खरेतर देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी १८ वर्ष विधिमंडळात होतो. कठोर टीका करायचो पण व्यक्तिगत मैत्री होती. थोडेसे आता जास्त झाल्यासारखे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला याचा कंटाळा आलाय. याला खरे कारण नेत्यांपेक्षा मीडियाच कारणीभूत आहे असं त्यांनी सांगितले. झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात नितीन गडकरींची मुलाखत घेण्यात आली. त्यात दिलखुलासपणे गडकरींनी सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली.
त्याचसोबत या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही तर विचारशून्यता समस्या आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाच्या विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल पण तुम्ही विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. मूळात याला मतदार जबाबदार आहे. जसं मुलीसाठी नवरा बघता, सासू-सासरे कसे आहेत. घर कसे आहेत याचा विचार करता मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाही. हा माझ्या जातीचा, हा माझ्या भाषेचा म्हणून मतदान करता. ज्यादिवशी जनता ठरवेल की, आम्ही देणारे मत विचारपूर्वक देऊ. बिल्कुल चुकीच्या माणसाला देणार नाही. त्यादिवशी राजकारणात आपोआप बदल होतील असं आवाहनही नितीन गडकरींनी जनतेला केलं.
....म्हणून मुख्यमंत्रिपद नाकारलं?
मी जेव्हा भाजपाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. मला दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. परंतु परिस्थिती अशी झाली की मी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो त्यामुळे मला दिल्लीत जावे लागले. मग दिल्लीत गेल्यानंतर मी ठरवलं पुन्हा महाराष्ट्रात यायचं नाही असं सांगत नितीन गडकरींनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले.
अपघाताला गडकरीच जबाबदार
मला एकदा मोठे सरकारी अधिकारी भेटले ते म्हणाले तुम्ही अपघातांसाठी जबाबदार आहात. मी म्हटलं मी कसा जबाबदार? त्यांनी सांगितले तुम्ही रस्ते इतके चांगले का केले? तुम्ही रस्ते चांगले केले म्हणून अपघात होतात. त्यामुळे तुम्ही रस्ते चांगले करण्याच्या भानगडीत पडू नको. मी म्हटलं मग आधीचे रस्ते खोदून काढूया अशी मिश्किल टिप्पणी नितीन गडकरींनी केली.