निकिता पोरवालने पटकावला 'मिस इंडिया'चा किताब, आता 'मिस वर्ल्ड' स्पर्धेसाठी तयारी करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:19 AM2024-10-17T10:19:41+5:302024-10-17T10:29:05+5:30

मुंबईत 'मिस इंडिया वर्ल्ड' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

मिस इंडिया वर्ल्ड 2024 (Miss India World 2024) चा खिताब यंदा निकिता पोरवालने पटकावला आहे.

मुंबईत 'मिस इंडिया वर्ल्ड' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. २०२३ ची मिस इंडिया वर्ल्ड ठरलेल्या नंदिनी गुप्ताने निकिताच्या डोक्यावर क्राऊन घातला.

निकिताने आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली याचा तिच्या कुटुंबाला प्रटंड अभिमान वाटतोय.

या सौंदर्यस्पर्धेत रेखा पांडे ही फर्स्ट रनर अप तर आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप ठरली.

मिस इंडिया वर्ल्ड 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील महालक्ष्मी येथील प्रसिद्ध स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आली होती.

'मिस इंडिया वर्ल्ड' जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना निकिता म्हणाली, "जेव्हा मी मागे वळून पाहते आणि आता ज्याठिकाणी पोहोचले याचा विचार करते, तेव्हा मला जाणवतं की माझ्यात भविष्य घडवण्याची ताकद आहे".

निकिताने टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती अभिनय आणि रंगभूमीकडे वळली. निकिताने नाटत आणि चित्रपटातही काम केलं आहे. निकिताला वाचन, लेखन, चित्रकला आणि चित्रपट पाहण्याची आवड आहे.

निकिता ही मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून आहे. निकिता पोरवाल यांनी महाराजा सयाजी राव विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.

आता 'मिस इंडिया वर्ल्ड' चा किताब जिंकल्यानंतर आता निकिता 'मिस वर्ल्ड' या सौंदर्यस्पर्धेसाठी तयारी करणार आहे.

यापुर्वी भारतातून ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखे (1999), प्रियांका चोप्रा (2000) आणि मानुषी छिल्लर (2017) यांनी याआधी मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलेला आहे.