दाक्षिणात्य अभिनेते कुंद्रा जॉनी यांचं निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:30 AM2023-10-18T11:30:44+5:302023-10-18T11:31:32+5:30
कुंद्रा जॉनी यांचं हृयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
दाक्षिणात्या फिल्म इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते कुंद्रा जॉनी (Kundra Johnny) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. त्यांनी मंगळवारी केरळच्या कोलम स्थित खाजगी रुग्णालयात अऱखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने फिल्मइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.
कुंद्रा जॉनी यांना काल हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांचं निधन झालं. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ काम केलं. ५०० पेक्षा जास्त सिनेमात भूमिका साकारल्या. कुंद्रा जॉनी यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात 1979 मध्ये 'नित्य वसंतम' सिनेमातून केली होती. मल्याळम सिनेमांमध्ये निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारण्यात ते लोकप्रिय होते. याशिवाय त्यांनी तमिळ सिनेमांमध्येही काम केलं.
कुंद्रा जॉनी यांनी 'गॉडफादर','इन्सपेक्टर बलराम', 'आवनाझी','चेंरोल','आराम थम्पुरन' यासारखे काही चित्रपट केले. आज दुपारी साडेतीन वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर उद्या सकाळी १० वाजता कांजीराकोडच्या सेंट एंथोनी चर्चमध्ये अंत्यसंस्कार होतील.