'छावा'मधील संभाजी महाराजांच्या लेझीम नृत्यावरुन वाद, अमोल कोल्हेंची स्पष्ट भूमिका, म्हणाले- "इतिहास योग्य पद्धतीने..."
By कोमल खांबे | Updated: January 24, 2025 16:22 IST2025-01-24T16:04:55+5:302025-01-24T16:22:50+5:30
Chhaava Trailer Controversy: 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे लेझीम खेळत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. यावरुन सिनेमाला विरोध होत आहे. यावर आता अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

'छावा'मधील संभाजी महाराजांच्या लेझीम नृत्यावरुन वाद, अमोल कोल्हेंची स्पष्ट भूमिका, म्हणाले- "इतिहास योग्य पद्धतीने..."
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पण, या सिनेमाच्या ट्रेलरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांवर शिवप्रेमींकडून आक्षेप घेण्यात आला आहे. 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे लेझीम खेळत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. यावरुन सिनेमाला विरोध होत आहे. यावर आता अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हेंनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून ती अजरामर केली. 'छावा' सिनेमाला होणाऱ्या विरोधाबाबत त्यांनी 'न्यूज १८ लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "चित्रपट पाहिल्याशिवाय त्याबाबत भाष्य करणं उचित ठरणार नाही. पण, संभाजी महाराज लेझीम नृत्य करतात म्हणून जर वाद निर्माण झाला असेल. तर हा आपला पारंपरिक नृत्यप्रकार आहे. त्यामुळे त्याविषयी वाद निर्माण व्हावा, असं मला वाटत नाही. 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेरसुद्धा योग्य पद्धतीने पोहोचवला जात असेल. तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे".
"त्यामुळे फक्त लेझीम नृत्य दाखवलं म्हणून त्यावर वाद व्हावा असं मला वाटत नाही. परंतु, त्याचबरोबरीने संभाजी महाराजांचा इतिहास हा योग्य पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या वेळी हा इतिहास मांडत असताना अनेक वर्षांची काजळी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासावर चढवण्याचा प्रयत्न झाला होता. तो पुसून एक लखलखीत इतिहास समोर आणण्याचं काम आमच्या टीमने केलं होतं. परंतु, छावा सिनेमाच्या माधम्यातून त्याचं पुढचं पाऊल टाकलं जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याविषयी अकारण वाद करण्याचं कारण नाही असं मला वाटतं", असंही ते म्हणाले.
दरम्यान, 'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी या मराठी कलाकारांचीही सिनेमात वर्णी लागली आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.