सूरजचं घराचं स्वप्न पुर्ण! भूमिपूजन कार्यक्रम पडला पार, 'गुलिगत किंग'ने अजित पवारांचे मानले आभार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 02:27 PM2024-10-27T14:27:51+5:302024-10-27T14:29:15+5:30
सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे.
Suraj Chavan New Home : 'गुलिगत धोका', 'झापुकू झुपूक' हे दोन शब्द कानावर आले की लगेच आठवतो सूरज चव्हाण. 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात लाखो प्रेक्षकांचं मन जिंकून सुरज चव्हाणने ट्रॉफी पटकावली. 'बिग बॉस'नंतर सुरजचा सिनेमादेखील आला. मोठ्या पडद्यावर झळकण्याचं स्वप्न पुर्ण झाल्यानंतर आता सुरजचं आणखी एक स्वप्न पुर्णत्वास येतय. सूरजच्या हक्काच्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे.
सूरजच्या घराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वतःच हक्काचं घर असावं हे सुरजचे स्वप्न होतं. सूरजने 'बिग बॉस'च्या घरात असताना अनेकदा घर बांधण्याची इच्छा बोलून दाखवली होती. सुरजचे हे स्वप्न पुर्ण करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी मदत केल्याची माहिती आहे. सुरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर अजित पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा अजित पवारांनी त्याला घर बांधण्यास मदत करु असा शब्द दिला होता.
भूमिपूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर सुरजने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अजित पवारांचे आभार मानले. सूरज म्हणाला, "घराचं स्वप्न पुर्ण होतंय, तर फार बरं वाटतंय, आनंद झाला. अजित पवार यांनी मला स्वप्न पुर्ण करणार असं सांगितलं होतं आणि त्यांनी ते पुर्ण केलं. त्याचे मनापासून काळजापासून आभार मानतो. अजित पवार यांनी गरीबाच्या मुलाला मदत केली. खूप चांगलं वाटलं".
एकिकडे सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम झाला. तर दुसरीकडे त्याच्या राहत्या घरी वीज जोडणी झाली आहे. काल अधिकृतरित्या सूरज चव्हाणच्या घरात वीज आली. मूळचा बारामतीचा असलेला सूरज सध्या 'बिग बॉस'नंतर त्याच्या गावी कुटुंबासह वेळ घालवत आहे. सूरजने कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आजच्या घडीला त्याने मोठं यश मिळवलं आहे. आता चाहते त्याच्या 'झापूक झुपूक' सिनेमाची वाट पाहात आहेत.