“उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 04:10 PM2023-07-10T16:10:59+5:302023-07-10T16:12:12+5:30
Devendra Fadnavis Khupte Tithe Gupte: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात संजय राऊतांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, माझा थोडा तरी स्तर ठेवा, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी घणाघाती टीका केली आहे.
Devendra Fadnavis Khupte Tithe Gupte: प्रसिद्ध संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या अवधूत गुप्ते याच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एकामागून एक राजकीय मंडळी येताना पाहायला मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. याचा एक प्रोमो समोर आला असून, यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तरे दिल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर रिलिज करण्यात आला आहे. १६ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असलेला भाग प्रदर्शित केला जाणार आहे. या प्रोमोमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना सोबत घेण्याचे कारण सांगताना उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहेत.
...तेव्हा अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते
या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जेव्हा उद्धव ठाकरे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवारांना बरोबर घेऊन शपथ घ्यावी लागते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. याशिवाय संजय राऊत यांचा एक व्हिडिओ या कार्यक्रमात दाखवण्यात आला आहे. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या प्रोमोत संजय राऊतांचा एक व्हिडिओ असून, यामध्ये ५०० रुपयांचे मनी लाँड्रिंग, १७८ कोटींचे मनी लाँड्रिंग, हिंमत आहे का देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची, असा सवाल या व्हिडिओत संजय राऊत करताना दिसत आहेत. यावर बोलताना, संजय राऊत १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, काय करते ईडी, असा सवाल करत, पुढे बोलताना, त्यांनी मला पत्र लिहिले आहे. तसेच मला वाटले नव्हते, तुम्ही प्रश्न विचारून या अशा माणसाला उत्तर द्यायला सांगाल म्हणून. माझा थोडा तरी स्तर ठेवा, असा सणसणीत पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे या प्रोमोत पाहायला मिळत आहे.