तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिजान खानची आरोपांतून मुक्तता नाहीच, कोर्टात झाली सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 13:02 IST2023-11-10T13:01:26+5:302023-11-10T13:02:43+5:30
तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर शिजान खानवर अनेक गंभीर आरोप लावले गेले होते.

तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिजान खानची आरोपांतून मुक्तता नाहीच, कोर्टात झाली सुनावणी
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आत्महत्या केली. यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिजान खान (Shizaan Khan)अडचणीत सापडला होता. त्याला ७० दिवस तुरुंगवास झाला आणि नंतर त्याला जामीन मिळाला. आता शिजान खान पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्याने हायकोर्टात याचिका दाखल करत स्वत:वर लावलेले आरोप रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्याची ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर शिजान खानवर अनेक गंभीर आरोप लावले गेले होते. त्यानेच तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे हे आरोप होते. सध्या अभिनेता जामीनावर बाहेर आहे आणि त्याने नुकताच खतरो के खिलाडी 13 या शोमध्येही सहभाग घेतला होता. तरी या प्रकरणातून त्याची पूर्णपणे सुटका झालेली नाही. हायकोर्टाने त्याची याचिका रद्द केल्याने त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
तुरुंगातून सुटल्यानंतर शिजान आणि त्याच्या कुटुंबाला बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते. ७० दिवस तुरुंगातील दिवसांबद्दलही तो बाहेर आल्यानंतर बोलला.शिजानने नंतर सोशल मीडियावरुन तुनिषाबद्दल प्रेम व्यक्त केले होते. तसंच तो निर्दोष असल्याचंही त्याने वेळोवेळी स्पष्ट केलं. मात्र कायद्याच्या कचाट्यातून त्याची अद्याप सुटका झालेली नाही.