काही राहिलं असेल तर माफ करा... मालिकेच्या आठवणीत डॉ. अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 12:22 PM2020-02-16T12:22:52+5:302020-02-16T14:58:49+5:30
निरोपाचा क्षण जवळ येत असल्याने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील सर्वच कलाकार भावूक झालेले दिसत आहेत. मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हेही भावूक झालेत.
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका आता प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. 2018 ला सुरू झालेल्या या मालिकेने रसिकांच्या मनावर जवळपास अधिराज्य गाजवले. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. निरोपाचा क्षण जवळ येत असल्याने मालिकेतील सर्वच कलाकार भावूक झालेले दिसत आहेत. मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हेही भावूक झालेत. मालिकेच्या काही आठवणी सांगताना त्यांचे डोळे भरून आले.
नुकतेच मालिकेतील सर्व कलाकारांनी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुक गावामध्ये येवून महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी मालिकेबद्दल बोलताना अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर झालेत.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे सांगत डॉ अमोल कोल्हे यांनी जनतेचे आभार मानले. ‘काही चुकलं, राहिलं असेल तर माफ करा,’ असे म्हणताना त्यांचे डोळे पाणवले. असे म्हणून कोल्हेंनी यावेळी अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुदु्रक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.
एक प्रवास कधीच न विसरता येणारा...... pic.twitter.com/jrjgtZ9rVS
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 2, 2020
‘स्वराज्य रक्षक संभाजी मालिका हे एक व्रत होते. स्पप्न होते. मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका संपताच मी सुद्धा अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेऊन शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास पडद्यावर दाखवला, तो 350 वर्षांनंतरही मराठी माणसांच्या मनात जिवंत राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.