'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेचं चित्रीकरण होतंय 'या' राज्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:28 PM2021-05-04T13:28:08+5:302021-05-04T14:30:33+5:30
नीना कुळकर्णी आणि डॉ. अमोल कोल्हे हे जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य भूमिकात दिसताहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. स्टार प्रवाह, झी मराठी वाहिनीवरील दैनंदिन मालिकांचे शूट आता महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. सोनीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेचे शूटिंगही राज्याबाहेर सुरु केले आहे.
महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा आणि एका मुलुखावेगळ्या आईची कथा 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. जिजाऊ माँसाहेबांनी शिवबांना कसं घडवलं, शिवबांनी स्वराज्य कसं स्थापन केलं; हा सगळा इतिहास या मालिकेतून उलगडतो आहे. राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे चित्रीकरणावर बंदी आली आहे, पण राज्याबाहेर जाऊन 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेच्या चित्रीकरणाला गुजरातमध्ये सुरुवात झाली आहे.
नीना कुळकर्णी आणि डॉ. अमोल कोल्हे हे जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य भूमिकात दिसताहेत. मालिका सध्या रंजक वळणावर असून राजे पन्हाळ्यावर सिद्दीच्या वेढ्यात अडकले आहेत. आता काही काळात सर्वश्रुत पन्हाळ्यावरून सुटका आणि पावनखिंडीतील थरार छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.