स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा एकदा भेटीला, धगधगता इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार रुपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 02:24 PM2022-04-28T14:24:05+5:302022-04-28T14:56:03+5:30
रील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं.
झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेने संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आणि म्हणूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली. संभाजी राजांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले प्रेक्षकांनी या मालिकेतून जाणून घेतले.सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालं.
प्रेक्षक अजूनही या मालिकेला पाहण्याचा मोह आवरु शकत नाही. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखरबर आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून १ मे पासून मे महिन्यातील प्रत्येक रविवारी छत्रपती संभाजी मालिका चित्रपट स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मालिकेतील प्रमुख घटना चित्रपट स्वरूपात प्रत्येक रविवारी प्रेक्षकांसाठी सादर केल्या जातील. येत्या रविवारी दुपारी १२ वा. प्रेक्षकांना पुन्हा एकदा संभाजी राजांनी घडवलेला इतिहास पाहायला मिळेल.