पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 15:10 IST2024-05-04T15:09:18+5:302024-05-04T15:10:18+5:30
Appi Amchi Collector: अर्जुन उत्तराखंडला गेला होता तिथे त्याची आणि सिम्बाची म्हणजेच अमोलची भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्यात भेट होणार आहे.

पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत
छोट्या पडद्यावर 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सध्या रंजक वळणावर सुरु आहे. उत्तराखंडमध्ये गेलेल्या अप्पीची सात वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्रात बदली झाली आहे. पुण्यात अपर्णाचं पोस्टिंग झालं आहे. विशेष म्हणजे अर्जुन आणि त्याचं कुटुंबदेखील सध्या पुण्यातच स्थायिक आहेत. त्यामुळे लवकरच या जोडीची भेटण्याची शक्यता आहे. आणि, या भेटीमागे त्यांचा मुलगा अमोल कारणमात्र ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी अर्जुन उत्तराखंडला गेला होता तिथे त्याची आणि सिम्बाची म्हणजेच अमोलची भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्यात भेट होणार आहे. विशेष म्हणजे अर्जुन आणि सिम्बा यांची भेट झाल्याची पुसटशी कल्पनादेखील अप्पीला नाही. मात्र, अमोल या दोघांच्या भेटीचा दुवा ठरणार असल्याचं दिसून येत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पुण्यात अर्जुन आणि सिम्बाची पुन्हा एकदा भेट होणार आहे. सिम्बा समर कॅम्पसाठी जातो. मात्र, तिथे त्याच्या ओळखीचं कोणीच नसतं. परिणामी, तो एकटाच बसून राहतो. या समर कॅम्पला अर्जुन सुद्धा जातो आणि पुन्हा त्याची सिम्बासोबत भेट होते. सिम्बाला असं एकट बसलेलं पाहून अर्जुन त्याच्या जवळ येतो आणि सिम्बाची कळी खुलते.
दरम्यान, या कॅम्पमध्ये सिम्बा आणि अर्जुन यांची भेट झाल्याचं अप्पीला जराही कल्पना नाही. परंतु, अर्जुन आणि सिम्बा यांची वारंवार होणारी ही भेट म्हणजे नियतीचा संकेत असून अप्पी हा संकेत समजू शकेल का? हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना उत्तर मिळणार आहे.