'मेडिगड्डा'वरुन राहुल गांधी 'केसीआर'वर बरसले; सिंचनाच्या नावाखाली जनतेची लूट केल्याचा आरोप

By संजय तिपाले | Published: November 2, 2023 12:56 PM2023-11-02T12:56:12+5:302023-11-02T12:57:38+5:30

तडे गेलेल्या पुलाची पाहणी : कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi slams Telangana CM 'KCR' over 'Medigadda' dam; Accused of looting the public in the name of irrigation | 'मेडिगड्डा'वरुन राहुल गांधी 'केसीआर'वर बरसले; सिंचनाच्या नावाखाली जनतेची लूट केल्याचा आरोप

'मेडिगड्डा'वरुन राहुल गांधी 'केसीआर'वर बरसले; सिंचनाच्या नावाखाली जनतेची लूट केल्याचा आरोप

गडचिरोली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वात कळीचा मुद्दा बनलेल्या महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाला २ नोव्हेंबर रोजी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी तेलंगणा केसीआर सरकारवर तोफ डागली. सिंचनाच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची लूट केली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणावरील एक किलोमीटर लांब असलेल्या पुलाचे तीन खांब खचले होते, त्यामुळे महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणारा हा मार्ग आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पूल खचल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले. भाजप व काँग्रेसने केसीआर यांच्यावर टीकेची झोड उठवत या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा भाग असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) धरणाला भेट दिली. तेलंगणात प्रचार दौऱ्यावर असलेले राहुल गांधी हैदराबादहून हेलिकॉप्टरने जयशंकर भूपालपल्ली येथील आंबटपल्ली गावातून धरणावर पोहोचले. यावेळी त्यांनी तडे गेलेल्या पुलाची पाहणी केली. तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, विधिमंडळ नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, आमदार श्रीधर बाबू आणि इतर नेते त्यांच्यासमवेत होते.

महिलांशी साधला संवाद

बॅरेजला भेट देण्यापूर्वी त्यांनी तेलंगणातील आंबटपल्ली गावात महिलांच्या सभेला संबोधित केले. त्यांनी केसीआर सरकारचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून कालेश्वरमचे वर्णन केले. “मला हे वैयक्तिकरित्या पहायचे होते आणि म्हणूनच मी येथे आलो आहे,” असे ते म्हणाले. या प्रकल्पात मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणातील जनतेकडून एक लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. तर, या प्रकल्पाचा लोकांना फायदा झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

 खोचक टीका, म्हणाले, हे तर कालेश्वर केसीआर एटीएम

या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 'कालेश्वरम एटीएम'कडे बोट दाखवत राहुल गांधी यांनी 'कालेश्वरम केसीआर एटीएम' असे नामकरण करण्याची सूचना करुन खोचक टीका केली.  काँग्रेसची सत्ता आल्यास केसीआर व त्यांच्या कुटुंबीयांनी या धरणात केलेल्या गैरव्यवहाराची रक्कम जनतेला परत मिळवून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Rahul Gandhi slams Telangana CM 'KCR' over 'Medigadda' dam; Accused of looting the public in the name of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.