गोव्यात भाजपाला धक्का देण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना; दिल्लीत खलबतं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 09:42 PM2018-10-13T21:42:24+5:302018-10-13T21:44:06+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीत राहुल गांधींच्या भेटीला
पणजी : गोव्यात सत्ता बदल होऊ शकतो अशा प्रकारची आशा विरोधी काँग्रेस पक्षात जागी झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून विविध पद्धतीने हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमधील असंतोषाचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष व्यूहरचना करत आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे दोन दिवस दिल्लीत आहेत. ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनाही भेटले. गोव्यातील आजारी सरकारमुळे प्रशासन ढेपाळल्याचे व लोकभावना सरकारप्रती बरीच कडू बनल्याची कल्पना चोडणकर यांनी गांधी यांना दिली आहे. सरकारबद्दलचा वाढता असंतोष आणि दोन मंत्र्यांना डच्चू दिल्यानंतर भाजपाच्या काही आमदारांनी जाहीरपणे केलेली टीका याबाबतची माहिती चोडणकर यांनी राहुल गांधींना दिली. अखिल भारतीय काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात गांधी यांना भेटल्यानंतर चोडणकर हे काँग्रेस अध्यक्षांच्याच वाहनातून त्यांच्या निवासस्थानी गेले.
भाजपचे दोन आमदार सध्या प्रचंड नाराज आहेत. ते राजीनामा देऊ शकतात का, याची चाचपणी सुरू आहे. तथापि, आम्ही सरकार पाडणार नाही. पण सरकार स्वत:हून पडण्याच्या वाटेवर आहे, असा दावा काँग्रेसच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, चोडणकर हे प्रदेशाध्यक्षपदी असल्याने मंत्री विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी काँग्रेसचे मोठे शत्रूत्व आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष मगोपला ऑफर देईल, अशी राजकीय क्षेत्रात चर्चा आहे. पण काँग्रेससोबत जाण्याची मगोपला मुळीच इच्छा नाही, असा दावा मगोपच्या नेत्यांनी केला आहे.
मगोपचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर हे शुक्रवारी दिल्लीत होते. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिल्याची अफवा काहीजणांनी उठविल्या. लोकमतने मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना विचारले असता, त्यात काहीच तथ्य नाही असे ढवळीकर यांनी सांगितले. सुदिन ढवळीकर यांच्यासोबत भाजपचे खजिनदार संजीव देसाई हे चोवीस तास होते. दोघेही दिल्लीत एकाच खोलीत राहिले होते. सुदिन ढवळीकर हे काँग्रेसच्या कार्यालयात जाण्याचा प्रश्नच येत नाही. सुदिन ढवळीकर यांनीही तशी चर्चा हास्यास्पद असल्याचे सांगितले. मी कधी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जाण्याचा विचारही करू शकत नाही असे ते म्हणाले.