Goa Election 2022 : दर महिन्याला गरीबांच्या खात्यात ६ हजार रुपये, 'न्याय योजना' आणण्याचं राहुल गांधींचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:03 PM2022-02-04T19:03:16+5:302022-02-04T19:03:38+5:30
Goa Election 2022 : राहुल गांधीनी दिलं जनतेला आश्वासन. व्हर्च्युअल रॅलीदरम्यान भाजपवरही साधला निशाणा.
Goa Election 2022 : सध्या गोवा विधानसभा निवडणुकांचं (Goa Assembly Election) बिगुल वाजलं आहे. दरम्यान, सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही पाहायला मिळत आहे. काँग्रेचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी गोव्यात एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच सत्तेत आल्यास गोव्यात 'न्याय योजना' लागू करणार असल्याची घोषणाही केली.
"आम्ही सत्तेत आल्यास गोव्याच्या लोकांसाठी न्याय योजना आणू. याअंतर्गत दर महिन्याला गोव्यातील सर्वात गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात ६ हजार रुपये टाकले जातील. यानुसार वर्षाला ७२ हजार रुपये तुमच्या खात्यात येतील," असं आश्वासन राहुल गांधींनी जनतेला दिलं. आमचं संपूर्ण ध्येय रोजगाराची निर्मिती करण्यावर असेल. कशाप्रकारे रोजगार निर्माण केले जातात याची आम्हाला कल्पना आहे. काँग्रेस हे गोष्ट समजते. आम्ही हे केलंही आहे. आम्ही पुन्हा एकदा हे तुम्हाला करून दाखवू असंही ते म्हणाले.
You saw how BJP govt failed in tourism, COVID19, & employment. We're not giving tickets to defectors, have given tickets to new people this time. Congress will form a govt in Goa with a full majority. The fight is between Congress & BJP only, do not waste your vote: Rahul Gandhi pic.twitter.com/DwTCb3kJZk
— ANI (@ANI) February 4, 2022
गोव्यात भाजप पर्यटन, कोरोना आणि रोजगार या सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे, ज्या लोकांनी दगाबाजी केली त्यांना तिकिट न देण्याचा यावेळी काँग्रेसनं निर्णय घेतला आहे. यावेळी आम्ही नव्या लोकांना तिकिट दिलंय. पूर्ण बहुमतात गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वासही राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केला. गोव्यात केवळ भाजप आणि काँग्रेसमध्येच टक्कर आहे, तुम्ही आपलं मत वाया घालवू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.