Goa Election 2022: “अरे मित्रा, मी काँग्रेसचा आहे, भाजपवाला नाही”; गोव्यात राहुल गांधींच्या कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 06:15 PM2021-10-30T18:15:51+5:302021-10-30T18:17:35+5:30
Goa Election 2022: राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यादरम्यान मच्छिमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अमित शाह यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) गोवा दौऱ्यावर असून, त्यातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीदेखील (Rahul Gandhi) गोव्यात गेले आहेत. यातच राहुल गांधी यांनी एके ठिकाणी मच्छिमार बांधवांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नावर राहुल गांधी यांनी मी काँग्रेसचा आहे, भाजपवाला नाही, असे वक्तव्य केल्याने मोठा हशा पिकला.
राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यादरम्यान मच्छिमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थित बहुतांश मच्छिमार बांधव कोकणी भाषेत प्रश्न विचारत होते. त्याचे भाषांतर करून राहुल गांधी यांनी सांगितले जात होते आणि त्यानंतर राहुल गांधी हे इंग्रजीतून या समस्येवर मत व्यक्त करत होते. त्याचेही भाषांतर करुन कोकणी भाषेत सांगितले जात होते.
मी काँग्रेसचा आहे, भाजपवाला नाही
यात एका मच्छिमार बांधवाने थेट इंग्रजीतून प्रश्न विचारत पेट्रोल महाग झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. एवढे महाग पेट्रोल मच्छिमार बोटीसाठी परवडत नाही असे सांगायला सुरुवात केली. तेव्हा त्या मच्छिमार बांधवाचे बोलणे मध्येच थांबवत राहुल गांधी म्हणाले की, अरे मित्रा, मला आशा आहे की तुला माहिती असेल, मी भाजपचा नाही, मी काँग्रेसचा आहे, असे वक्तव्य केल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर ती व्यक्ती म्हणाली की, आश्वासन दिल्यावर तुम्ही उद्या सत्तेत आल्यावर असे वागू नका. हे मी आत्ताच सांगतो, असे संबंधित व्यक्तीने स्पष्टपणे सांगितले.
नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल
सुमारे ५० मिनिटांच्या या संवाद कार्क्रमात राहुल गांधी यांच्यासमोर मच्छिमार बांधवांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. तेव्हा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले. असाच संवाद साधत लोकांची मते जाणून घेतल्यावरच गोवा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार केला जाईल आणि जाहीरनाम्यात जे आश्वासन दिले जाईल, ते पूर्ण केले जाईल, असे राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.