लोकशाहीसाठी काळा दिवस; भारत जोडो यात्रेच्या यशाला घाबरूनच भाजपची कृती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 08:51 AM2023-03-25T08:51:33+5:302023-03-25T08:52:38+5:30
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी गोवा काँग्रेसची भाजपवर सडकून टीका.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या यशाला घाबरूनच भाजप सरकारने नेते राहुल गांधी यांची खासदारकी अपात्र ठरवली. आजचा दिवस हा लोकशाहीसाठीचा काळा दिवस आहे. सदर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत केली.
राजकीय भाषण केले म्हणून अशा प्रकारे खासदारकी रद्द करणे हा लोकशाहीचा खून आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकार आहे. अदानी तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्दयांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपने हे सर्व केले आहे. सदर प्रकार हा लोकशाहीला घातक आहे. राहुल गांधी यांनी भाजप जोडो यात्रेदरम्यान सरकारला उघडे पाडले. या यात्रेला मिळालेले यश पाहून सरकार घाबरल्यानेच हे सर्व झाल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, राहुल यांच्यावर भाजप नेत्यांनी कुठलेही तथ्य जाणून न घेताच चुकीचे आरोप केला. अशा प्रकारे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल यांची खासदारकी अपात्र ठरवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे. त्यांचा आवाज दाबण्यासाठीच हे सर्व केले आहे.
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले की, काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीची याचिका चार वर्षे झाली तरी प्रलंबित आहे. त्यावर अजूनही निर्णय होत नाही. मात्र, राहुल यांची खासदारकी ताबडतोब अपात्र ठरवली. हा प्रकार निषेधार्ह आहे. हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फेरेरा उपस्थित होते.
कायदेशीर निर्णय: अॅड. यतीश नायक
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा कायदेशीर निर्णय आहे. कॉंग्रेस ज्या प्रकारे याचा गाजावाजा करत आहे की, भाजप लोकशाहीचा खून करत आहे किंवा भाजप राहुल गांधींना भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, यामध्ये काहीच तथ्य नाही, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते अॅड. यतीश नायक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल गांधी यांच्याविरोधात २०१९ मध्ये पुर्निश मोदी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर काही टिप्पणी केली होती, या पार्श्वभूमीवर ही तक्रार होती. त्या खटलाचा निकाल न्यायालयाने आता दिला असून, गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जर एखाद्या खासदाराला शिक्षा झाली आहे, तर त्यांचे खासदारकी रद्द करण्याचा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे, असे अॅड. नायक यांनी यावेळी सांगितले. सर्वकाही कायद्यानुसारच होत आहे, आणि कायदा सर्वांसाठी एकच आहे, असेही अॅड. नायक यांनी पुढे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"