राहुल गांधींची जानेवारी महिन्यात गोवा भेट शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:06 PM2018-12-26T13:06:15+5:302018-12-26T13:06:18+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या महिन्यात गोवा भेटीवर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रव्यापी जनसंपर्क अभियान समाप्त झाल्यावर 20 जानेवारीनंतर तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात ते कधीही गोव्यात येण्याची शक्यता आहे.
पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या महिन्यात गोवा भेटीवर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रव्यापी जनसंपर्क अभियान समाप्त झाल्यावर 20 जानेवारीनंतर तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात ते कधीही गोव्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांचा दौरा केवळ एक दिवसाचा असेल. सकाळी गोव्यात येऊन सायंकाळी परततील. या भेटीच्यावेळी ते काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करतील. प्रदेश समितीने यासंबंधी कार्यक्रमाची रुपरेषा आखण्याचे काम सुरू केले आहे.
राहुल गांधी यांनी स्वत:हून गोवा दौ-यावर येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर राहुल यांची गोव्यातील ही पहिलीच भेट ठरणार आहे. दरम्यान, राफाल प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनवर आणलेल्या मोर्चाला महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तराचे राहुलजींनी सोशल मीडियावरुन कौतुक केले होते. या मोर्चाला धीरोधात्तपणे तोंड दिल्याबद्दल काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांचे अभिनंदनही केले होते.