काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; राहुल गांधींवरील कारवाईचा गोव्यात निषेध, 'ते' फुटीर अपात्र कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 08:03 AM2023-03-27T08:03:29+5:302023-03-27T08:04:14+5:30
राहुल गांधी यांची खासदारकी अपात्र ठरविल्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेसने जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे सत्याग्रह आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी:काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत अपात्र ठरवण्यात आली. मग गोव्यातील फुटीर आमदारांनाच अपात्र ठरवण्यासाठी विलंब का? त्यांना कधी अपात्र ठरविणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जुने गोवे येथे आयोजित सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी केला.
राहुल गांधी यांची खासदारकी अपात्र ठरविल्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेसने जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जझे फिलीप डिसोझा, अविनाश भासले, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा, अॅड. कार्लस फेरेरा व पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते.
आलेमाव म्हणाले, गांधी यांना अवघ्या २४ तासांत अपात्र ठरवले. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात ते आवाज उठवत असल्यानेच ही कारवाई झाली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झाले, ते उद्या केवळ विरोधकच नव्हे, पण भाजपच्या नेत्यांसोबतही होऊ शकते. कारण मोदी सरकारला त्यांच्याविरोधात कुणीच आवाज उठविलेला नको आहे. गोव्यात काँग्रेसच्या फुटीर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी होत असताना सदर विषय प्रलंबित आहे. या फुटीर आमदारांना अपात्र का ठरविले जात नाही, असा प्रश्न त्यांनी केला.
मिशन कमिशन
गोवा सरकारचे सध्या केवळ कमिशन हे मिशन बनले आहे. कमिशन मिळविण्यासाठीच त्यांची धडपड आहे. सोमवारपासून सुरु होणाया अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सरकारला धारेवर धरले जाईल. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठविला जाईल, असा इशारा आलेमाव यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"