सुभाष वेलिंगकर वादाची धग कायम; भाजप जातीय तणाव निर्माण करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 12:58 PM2024-10-07T12:58:17+5:302024-10-07T12:59:12+5:30
मडगावातील ख्रिस्ती समाजाचे आंदोलन स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव/पणजी : ख्रिस्ती समाजाकडून गेल्या तीन दिवसांपासून माजी संघचालक (गोवा) प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात सुरू असलेले रविवारी दुपारी आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनाविरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली. तर वेलिंगकर यांचा राज्यासह महाराष्ट्रात शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी काल, त्यांच्या घरावर दुसऱ्यांदा नोटीस चिकटवून हजर राहण्यास बजावले होते. मात्र, ते हजर राहिले नाहीत. वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी पणजी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज, सोमवारी सुनावणी होईल. डिचोली पोलिसांनाही न्यायालयाने बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, म्हापशातील देव बोडगेश्वर मंदिरासमोर झालेल्या सभेत हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी वेलिंगकर यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे मडगावात पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. चर्च संस्थेने, लोकांनी शांतता पाळावी, सरकारने वेलिंगकरांवर कारवाई करावी असे आवाहन केले असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपच जातीय तणाव निर्माण करतेय असा आरोप केला आहे.
रविवारी सकाळी १० वाजता मडगावमधील ओल्ड कोलवा सर्कलवर काही आंदोलनकर्ते जमले. रस्त्याकडेला बसून प्रार्थना करत त्यांनी वेलिंगकर यांनी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांची डीएनए चाचणी करा अशा केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. पुन्हा शहरातील रस्ते अडवून वाहतूक कोंडी केली जाईल या शक्यतेने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दुपारी १२.३० च्या सुमारास रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर दबाव निर्माण झाला. प्रतिमा कुतिन्हो यांनी वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती देत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
वेलिंगकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. मडगावात ५०० जणांवर गुन्हे दाखल. म्हापशात हिंदू संघटनांचा वेलिंगकर यांना पाठिंबा. ख्रिस्ती समाजाकडून परदेशातही विविध ठिकाणी निदर्शने. वेलिंगकर यांचा गोव्यासह महाराष्ट्रात शोध सुरू असल्याची पोलिसांची माहिती. राज्यपालांनी सद्यस्थितीत हस्तक्षेप करण्याची विजय सरदेसाईंची मागणी.
आंदोलकांवर गुन्हे
बेकायदेशीरपणे सभेचे आयोजन, रस्ता अडवणे आणि जनतेला नाहक अडथळा करून त्रास दिल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह इतर ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. शुक्रवारी आणि शनिवारी आंदोलने झाली. याबाबत भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२) (३), (५), २८५, २२३ (अ) (ब), १२६ (२), १२५, ३२४ (१), १३२, ११५ (२) आर/डब्ल्यू १९१ अन्वये गुन्हे नोंदविले आहेत.
वेलिंगकरांच्या घरावर दुसऱ्यांदा नोटीस
माजी संघचालक (गोवा) सुभाष वेलिंगकर हे अजून पोलिसांना सापडलेले नसून त्यांच्या येथील बंद घराच्या दरवाजावर पोलिसांनी दुसऱ्यांदा नोटीस चिकटवून त्यांना काल, रविवारी सायंकाळी ५ वाजता डिचोली पोलिस स्थानकात चौकशीस हजर राहण्यास बजावले होते. परंतु ते काही फिरकले नाहीत.