चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 04:12 PM2021-01-11T16:12:07+5:302021-01-11T16:13:24+5:30
Bird flu News & Latest Updates : बाहेरून येत असलेल्या प्रक्रिया केलेल्या कोंबडीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटात आता बर्ड फ्लूच्या प्रसारानं हाहाकार पसरवला आहे. आतापर्यंत ९ राज्यात बर्ड फ्लू वेगानं पसरल्याचं दिसून आलं आहे. उत्तरप्रदेशात पक्ष्यांच्या नमुन्यात बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला असून दिल्ली आणि महाराष्ट्रातही बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. याआधीही मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि केरळमध्ये बर्ड फ्लूच्या केसेस समोर आल्या आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, ''संजय तलावातून घेण्यात आलेले पक्ष्याचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, त्या भागाची स्वच्छता करण्यात आली आहे. आणखी काही नमुने पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल लवकरच येणार आहे. घाबरून जाण्याची गरज नाही, या आजाराचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.''
पुढे त्यांनी सांगितलं की, ''दिल्लीत बाहेरून येत असलेल्या प्रक्रिया केलेल्या कोंबडीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिकन आणि अंडी खाणार्या लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही कारण जर आपण पूर्णपणे शिजवलेली कोंबडी किंवा उकडलेले अंडे खाल्ले तर आपल्याला संसर्ग होणार नाही.''
बर्ड फ्लूमुळे मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरीच्या दापोली येथे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आयसीएआर-एनआईएचएसएडी चाचणी अहवालात देण्यात आली आहे. पशुसंवर्धन सचिव अनुपकुमार यांचे म्हणणे आहे की कलेक्टरर्सना दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीच्या अहवालात या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय
उत्तरप्रदेश
कानपूरमधील चिमण्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू मिळाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. चार पक्ष्यांच्या मृत्यूनंतर तपासणी अहवालात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. कानपूर आयुक्त राजशेखर यांच्या आदेशानुसार प्राणीसंग्रहालयाच्या सभोवतालचा परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तेथील रहिवासीही याबाबत सतर्क झाले आहेत. कानपुर प्राणिसंग्रहालयात दोन दिवसांत दहा पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने चार नमुने नमुने भोला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तिथून या अहवालात बर्ड फ्लूची लक्षणे चौघांमध्ये आढळली.
केरळ
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री के.आर. राजू म्हणाले होते की, ''दोन जिल्ह्यात बदकांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो बदकं मारले जातील. सरकार शेतकर्यांना नुकसानभरपाई देईल. आतापर्यंत 12 हजार बदके मेली आहेत, तर 36 हजारांचा बळी घेतला जाणार आहे. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.''
Bird Fluचा कहर, चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध, अशी घ्या काळजी; WHOचा मोलाचा सल्ला
मध्यप्रदेश
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मृत आढळलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूची पुष्टी झाली होती. राज्याचे आरोग्य विभागाचे डॉ. अमित मालाकर म्हणाले होते की, ''आतापर्यंत 150 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांमधील संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्मचीही चौकशी केली जात आहे. त्यांनी सांगितले की H5N8 विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. तथापि, माणसांमध्ये या आजाराची उपस्थिती अद्याप व्यक्त झालेली नाही.