भारतीय लोकशाही कोसळली, तर जगावर परिणाम होईल; राहुल गांधी यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:55 PM2023-06-03T13:55:16+5:302023-06-03T13:55:43+5:30
ते सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
वॉशिंग्टन : भारतीय लोकशाही संपूर्ण जगाच्या हिताची असून, ती जर कोसळली तर याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल व ते अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचे नाही, असे राहुल गांधी यांनी येथे म्हटले. ते सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. लोकशाहीचा मुद्दा हा देशाचा अंतर्गत विषय आहे. भारतातील लोकशाहीसाठी लढणे हे आमचे काम आहे आणि ही एक अशी गोष्ट आहे जी आम्हाला चांगल्या प्रकारे समजते आणि ती आम्ही करत आहोत, असे ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले.
काँग्रेस पुढील तीन-चार विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव करेल, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. सत्ताधारी पक्षाला धूळ चारण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत बाबी आमच्याकडे असून, बहुतांश भारतीय लोकसंख्येचा या सत्ताधारी पक्षाला पाठिंबा नाही, असाही दावा त्यांनी केला. राहुल गांधी तीन अमेरिकी शहरांच्या दौऱ्यावर आहेत. प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी फ्रँक इस्लाम यांनी त्यांच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात राहुल यांनी वरील टिप्पणी केली.
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले की, लोकांना असे वाटते की, आरएसएस व भाजपच्या सामर्थ्याला रोखता येणार नाही. मात्र, तसे नाही. देशात सुप्त वातावरण बनत आहे. ते आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लाेकांना चकित करू शकते. भारतात विराेधी पक्ष एकत्र आहेत. आम्ही आणखी काही पक्षांसाेबत चर्चा करीत आहाेत.
‘गेल्या नऊ वर्षांत समाजाचे ‘ध्रुवीकरण’ झाले’
वॉशिंग्टन : गेल्या नऊ वर्षांत देशाचे ‘ध्रुवीकरण’ झाले आहे आणि मूठभर लोकांच्या हातात सत्ता आणि संपत्ती एकवटली आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केला आहे. पित्रोदा हे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असून, ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
‘मुस्लीम लीग’वरून भाजप-काँग्रेस आमने-सामने
- इंडियन युनियन मुस्लीम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मोहंमद अली जीना यांच्या ऑल इंडिया मुस्लीम लीगमागे जी मानसिकता होती तीच मानसिकता या केरळी पक्षाची आहे, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला.
- राहुल गांधी आणि काँग्रेसला हिंदू दहशतवाद दिसतो; पण मुस्लीम लीग धर्मनिरपेक्ष वाटते, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. त्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. राहुल ज्या मुस्लीम लीगविषयी बोलले तो भाजपचे प्रेम असलेल्या मुस्लीम लीगहून वेगळा आहे.