केंब्रिजनंतर आता ब्रिटिश संसद… राहुल गांधी आज ‘इंग्रजांना’ लोकशाहीचा धडा शिकवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:55 PM2023-03-06T13:55:09+5:302023-03-06T13:55:17+5:30
Rahul Gandhi News: केंब्रिज यूनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींनी दिलेल्या भाषणामुळे भारतता मोठा गोंधळ उडाला आहे.
Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी आज ब्रिटनच्या संसदेत भाषण करणार आहेत. यापूर्वी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात लोकशाहीवर व्याख्यान दिले होते. त्यात त्यांनी भारतातील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी लोकशाही, यंत्रणांवरील दबाव, पेगासस सॉफ्टवेअर यांसह इतर अनेक मुद्द्यांवरुन केंद्रावर निशाणा साधला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी आज यूके खासदार, लॉर्ड्स बॅरोनेस आणि इतरांना 6 मार्च रोजी म्हणजेच आज वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये संबोधित करतील. ब्रिटीश संसदेत राहुल गांधी यांचे हे भाषण सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांवर असेल. लंडनस्थित थिंक टँक चेथम हाऊसमध्येही ते बोलणार आहेत. यानंतर ते काही खासगी व्यावसायिक बैठकांनाही उपस्थित राहणार आहेत.
केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला
केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात राहुल गांधी यांनी भारतात लोकशाहीवर हल्ला होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही संरचना नष्ट करत असल्याचा आरोप केला होता. भारतातील विरोधकांच्या स्थितीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला सतत वेगळ्याच प्रकारचा दबाव जाणवतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, पेगाससद्वारे पाळत ठेवली जात आहेत.
सर्व संस्थांवर हल्ले होत आहेत
ते पुढे म्हणाले होते की, माझ्यावर असे काही गुन्हे दाखल करण्यात आले होते, जे कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी स्वरुपाचे नव्हते. प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना, न्यायव्यवस्था, संसद या सर्वांवरच हल्ला होत आहे आणि सामान्य माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडणे आम्हाला फार कठीण जात होते.