Rahul Gandhi America:'हॅलो मिस्टर मोदी...', राहुल गांधींनी काढला फोन अन् पुन्हा एकदा लावला 'फोन टॅपिंग'चा आरोप...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:38 PM2023-06-01T13:38:48+5:302023-06-01T13:44:43+5:30
Rahul Gandhi America: राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांनी भाजपवर फोन टॅपिंगचा आरोप लावला आहे.
Rahul Gandhi America: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी सिलिकॉन व्हॅलीस्थित स्टार्टअप उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारवर निशाणा साधला. पेगासस आणि अशा इतर तंत्रज्ञानाच्या मुद्द्याबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'मला माहितीये माझा फोन टॅप केला जातोय. पण, मला त्याचा त्रास नाहीये.' यावेळी राहुल यांनी त्यांचा फोन काढला आणि गमतीने, ''हॅलो! मिस्टर मोदी" असे म्हटले.
It was a pleasure to engage with the learned audience at @Stanford on 'The New Global Equilibrium'.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 1, 2023
We discussed the challenges and opportunities of a changing world order. Actions based on truth is the way forward. pic.twitter.com/6tEoCV6OsM
मला माहितीये की, माझा फोन टॅप होतोय: राहुल
राहुल गांधी यावेळी पेगासस स्पायवेअर आणि तशाप्रकारच्या तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावर चर्चा करत होते. यावेळी राहुलने यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांना म्हणाले की, आता अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची मला अजिबात चिंता नाही. माझा फोन टॅप होतोय, हे मला चांगलंच माहीतीये. एखाद्या देशाने तुमचा फोन टॅप करायचे ठरवले असेल, तर त्याला तसे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. देशाला फोन टॅपिंगची इच्छा असेल तर अशी लढाई लढण्यात काही अर्थ नाही. मी जे काही करतोय, त्या प्रत्येक गोष्टीची सरकारला माहिती आहे, असंही राहुल म्हणाले.
डेटा म्हणजे सोनं – राहुल
राहुल सनीवेलमधील 'प्लग अँड प्ले टेक सेंटर'मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदाही उपस्थित होते. भारतातील दुर्गम खेड्यातील लोकांशी तंत्रज्ञान जोडणे आणि त्याचे परिणाम यावरही राहुल बोलले. राहुल म्हणाले, डेटा हे एक प्रकारचं सोनं आहे आणि भारतासारख्या देशांनी त्याची क्षमता ओळखली आहे. डेटा सुरक्षेबाबत योग्य नियमांची गरज आहे, असंही राहुल म्हणाले.
राहुल गांधींचा अमेरिका दौरा
राहुल गांधी मंगळवारी अमेरिकेत पोहोचले. येथे त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय समुदायातील लोकांना संबोधित केले. राहुल यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. राहुल वॉशिंग्टन डीसीमध्ये खासदार आणि थिंक टँकच्या बैठका घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा शेवट 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील जाहीर सभेने होणार आहे. हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये होणार आहे.