काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 05:55 AM2024-10-06T05:55:39+5:302024-10-06T05:56:28+5:30
दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक वर्गाला खाली दाबायचा हा तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडाच आहे. संविधानाचे रक्षण हेच त्यावरील उत्तर आहे. ते कसे करायचे, याचे माझ्याकडे दोन-तीन सोपे उपाय आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पंतप्रधान मोदी काहीही करू देत, ते कितीही डान्स-गाणी करू देत. भाजपवाले कितीही नाचू देत ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंत आम्ही तोडणारच. जातनिहाय जनगणनेचा कायदा आम्ही लोकसभा व राज्यसभेत करणार आहे. जगातील कोणतीही शक्ती त्यापासून आम्हाला रोखू शकत नाही. हा आमचा शब्द आहे आणि हवे तर तो मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलनात इंडिया आघाडीचा पुढील कृती कार्यक्रम जाहीर केला.
या दोन गोष्टी केल्यानंतरच देशातील ९० टक्के समाज असलेल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन समाजाच्या विकासाचे राजकारण सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी संविधानाच्या प्रतिमेला अभिवादन करूनच भाषणाला सुरुवात केली. देशाचे अर्थकारण, समाजकारण, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था १० टक्के समाजाच्या हातात एकवटली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
मोदींचे बेगडी संविधान प्रेम...
पंतप्रधान मोदी यांना संविधानबद्दल अजिबात ममत्व नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर संविधान मस्तकी लावले. देशातील जनतेने त्यांना निकालाद्वारे हे करायला लावले, अशी टिप्पणीही राहुल गांधी यांनी केली.
संविधानाचे रक्षण करण्यासाठी सांगितले दोन सोपे उपाय...
दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक वर्गाला खाली दाबायचा हा तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडाच आहे. त्याच्याविरोधात आपल्याला रणनीती निश्चित करायची आहे. संविधानाचे रक्षण हेच त्यावरील उत्तर आहे. ते रक्षण कसे करायचे, याचे माझ्याकडे दोन-तीन सोपे उपाय आहेत. पहिला उपाय ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंत तोडली पाहिजे. दुसरा उपाय हा जात जणगणनेचा आहे. देशातील मागासलेल्या जातसमूहाची लोकसंख्या किती आहे, हे कुणालाच अधिकृत माहीत नाही. त्यामुळे जात समूहांची सामाजिक-आर्थिक पाहणी करणारच.
आंबेडकर यांची दूरदृष्टी
राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवातच ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असे म्हणत केली. शिका म्हणजे नुसते कॉलेजचे शिक्षण नव्हे, तर परिस्थितीची आकलन करण्याची क्षमता तुमच्यात तयार व्हायला हवी. संघटित झाला नाही तर तुमची ताकद एकवटणार नाही आणि व्यवस्था बदलासाठी दिशा सापडणार नाही. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण भारतातच झाले. त्यावेळी शालेय शिक्षणात अस्पृश्यतेबद्दल काही वाचायला मिळाले नाही. दलितांच्या हक्कांबद्दलचे एकही पुस्तक तेव्हा शिक्षणात नव्हते, असेही ते म्हणाले.
हे संमेलन कोल्हापुरातच का घेतले...?
देशातील धर्मवाद्यांचा, जातीयवाद्यांचा रथ रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. कोल्हापूरही जगाच्या पाठीवर सर्वात प्रथम आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची भूमी असल्यानेच दक्षिण भारतातून उत्तरेकडे जाताना येणारे पहिले समतेचे गाव म्हणून कोल्हापुरात आम्ही संमेलन घेतल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.