छत्रपतींच्या विरोधातील प्रवृत्तींविरोधात लढाई: राहुल गांधी, शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:33 AM2024-10-06T09:33:23+5:302024-10-06T09:33:46+5:30
राहुल गांधी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोटला उभारला आणि काहीच दिवसांत तो कोसळला. ज्यांनी पुतळा उभारला त्यांची नियत चांगली नव्हती. पुतळा पडला, कारण यांची विचारधाराच भ्रष्ट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संविधान संपवण्याची विचारधारा जुनीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकालासुद्धा त्यावेळी विरोध झाला होता. ज्याविरोधात शिवाजी महाराज यांना लढावे लागले, त्याच प्रवृत्तीविरोधातच काँग्रेसची लढाई आहे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.
कसबा बावडा (ता. करवीर) येथील भगवा चौकात डॉ. संजय डी. पाटील व आ. सतेज पाटील यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी अनावरण करण्यात आले. खा. शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शानदार समारंभाला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, हा देश सर्वांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. हाच संदेश छत्रपती शिवरायांनी जगाला दिला. त्यांच्या विचारांचे सध्याच्या काळातील प्रतीक म्हणजे हे संविधान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज नसते, तर संविधान झाले नसते. सध्या भारतात दोन विचारधारांमध्ये लढाई सुरू आहे. एक विचारधारा ही संविधानाचे रक्षण करते, समानता आणि एकतेचा विचार करते, जी शिवाजी महाराजांची होती, तर दुसरी विचारधारा संविधान संपवायला निघाली आहे. आ. सतेज पाटील म्हणाले, कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे.
भ्रष्टाचारांमुळेच राजकोटचा पुतळा पडला
राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोटला उभारला आणि काहीच दिवसांत तो कोसळला. ज्यांनी पुतळा उभारला त्यांची नियत चांगली नव्हती. पुतळ्यानेच संदेश दिला की, पुतळा उभारणार असाल, तर संविधानाचे संरक्षणही तुम्हाला करावे लागेल. पुतळा पडला, कारण यांची विचारधाराच भ्रष्ट आहे.
टेम्पो चालकाच्या कुटुंबासोबत राहुल गांधी यांनी घेतले भोजन
उचगाव (जि. कोल्हापूर) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी उचगाव येथील टेम्पो चालक अजयकुमार सनदे यांच्या घरी अचानक दिलेली भेट कुतूहलाचा विषय ठरली. यावेळी राहुल यांनी स्वत: भाज्या बनवत दलित असलेल्या सनदे कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला.
कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक उचगावातील छोटेशे कौलारू घर असलेल्या टेम्पो चालक अजयकुमार सनदे यांच्या घरी भेट दिली. सनदे कुटुंबाशी संवाद साधत त्यांनी स्वत: स्वयंपाक घराचा ताबा घेऊन हरभरा आणि कांद्याची भाजी केली. अंजना सनदे यांनी भाकरी केल्या.
त्यानंतर सनदे कुटुंब आणि गांधी यांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी सनदे कुटुंबीयांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. सुमारे ४० मिनिटानंतर गांधी यांच्या वाहनांचा ताफा उचगावातून बाहेर पडला.