मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 08:23 PM2023-12-07T20:23:49+5:302023-12-07T20:24:20+5:30
मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवताना, लोकसभा २०२४ ची सेमी फायनल ३-२ ने जिंकली. मध्य प्रदेशातकाँग्रेसची सत्ता येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने मोठा विजय मिळवून सत्ता कायम राखली. लक्षणीय बाब म्हणजे दारूण पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे. पण ही अफवा असल्याचे कळते.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले असले तरी पक्षाने ही अफवा असल्याचे म्हटले. काँग्रेस हायकमांड लवकरच नव्या अध्यक्षाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले कमलनाथ प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी भीती कायम आहे. पण अद्याप त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही.
कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा!
१७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले आणि छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या तीन राज्यांसह रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या पराभवानंतर रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले होते की, आम्हाला मध्य प्रदेशच्या मतदारांचा जनादेश मान्य आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कमलनाथ यांनीही भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि भाजपा राज्यातील जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा कमलनाथ यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३ मध्ये, भाजपाने १६३ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.