"आम्हाला माहिती असतं तर...", अखिलेश यादव काँग्रेसवर संतापले; 'इंडिया'त वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:50 PM2023-10-19T20:50:35+5:302023-10-19T20:51:08+5:30
madhya pradesh election : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. पण, लोकसभेला अजून बराच कालावधी राहिला असतानाच विधानसभेच्या जागांवरून 'इंडिया'त वादाची ठिणगी पडल्याचे दिसते. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2023) तारखा जाहीर झाल्या आहेत. अशातच 'इंडिया' आघाडीचे सदस्य असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे उघडकीस आले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 'इंडिया' आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. आघाडी केवळ केंद्रीय पातळीवरच झाली असेल तर पक्ष विचार करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले, "विधानसभा स्तरावर आघाडी झाली नाही हे मला माहीत असते तर आमच्या पक्षाचे लोक त्यांना (काँग्रेस) भेटायला कधीच गेले नसते. आम्ही देखील काँग्रेसच्या लोकांना यादी दिली नसती. जर 'इंडिया' ही आघाडी फक्त उत्तर प्रदेशात केंद्रात यश मिळवण्यासाठीच असेल तर त्याचा विचार केला जाईल."
"अगर ये मुझे पहले दिन पता होता कि विधानसभा स्तर पर कोई गठबंधन नहीं है INDIA का तो कभी मिलने नहीं जाते हमारी पार्टी के लोग और न ही हम कभी सूची देते कांग्रेस के लोगों को। गठबंधन केवल उत्तर प्रदेश में केंद्र के लिए होगा तो उसपर विचार किया जाएगा।"
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 19, 2023
- माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री… pic.twitter.com/ZdDN9ETgxw
दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशातील १८ जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन राज्यातील सत्ताधारी पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतापलेल्या अखिलेश यांनी 'इंडिया' आघाडीबद्दल पुनर्विचार करण्याचे संकेत दिले.
माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ जे आता पक्षाच्या राज्य युनिटचे प्रमुख आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी पक्षाच्या कामगिरीवर चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितले की आमचे आमदार यापूर्वी कोणत्या मतदारसंघातून जिंकले होते याचा विचार व्हावा. तसेच मागील निवडणुकीत दोन नंबरवर असलेल्या 'सपा'च्या उमेदवारांची माहिती देण्यात आली. याबाबत रात्री एक वाजेपर्यंत चर्चा सुरू होती.
सहा जागांसाठी आश्वासन दिले होते - अखिलेश यादव
"कमलनाथ यांनी आम्हाला सहा जागांसाठी विचार करू, असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी उमेदवार जाहीर केले तेव्हा 'सपा'साठी काहीच जागा सोडल्या नाही. जर माहिती असते की राज्यपातळीवर आघाडी नाही तर एकत्रच आलो नसतो. असे कळले असते तर काँग्रेससोबत आलोच नसतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबद्दल विचार केला जाईल. ते आमच्याशी जसे वागतात तसे आम्हीही वागू", असेही अखिलेश यादव यांनी नमूद केले.