काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला : पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:19 AM2024-04-15T11:19:42+5:302024-04-15T11:20:06+5:30
मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पिपरिया (मध्य प्रदेश) : काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. मात्र, आमच्या सरकारने त्यांचा नेहमीच सन्मान केला, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेसने कधीच आदिवासींचे योगदान मान्य केले नाही. मात्र, भाजप सरकारने त्यांना गौरविले, असे ते म्हणाले.
भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मोदी म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला, मात्र, आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान केला. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच एक आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती होऊ शकली. मी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो तर देशात आगडोंब उसळेल, असेे काँग्रेस म्हणत आहे. देशाला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे हे विरोधी इंडिया आघाडी ठरवू शकत नाही. त्यामुळे ते असे म्हणत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.
ते देशाचे संरक्षण करू शकत नाहीत...
‘फिर एक बार, मोदी सरकार’चा देशभर गजर सुरू आहे. विरोधी आघाडी इंडियाचा घटक असलेल्या एका पक्षाने निशस्त्रीकरणाचे आश्वासन दिले आहे. आमच्या देशाच्या रक्षणासाठी आमच्याकडे अण्वस्त्रे असणे आवश्यक आहे. जे वेगळे सूर लावत आहेत ते भारताचे संरक्षण करू शकत नाहीत. मोदींचे स्वत:चे कोणतेही स्वप्न नाही. तुमची स्वप्ने साकार करणे हेच माझे स्वप्न आहे, असे ते म्हणाले.