"काँग्रेस म्हणजे हमास"; निवडणूक प्रचारात भाजपा खासदाराची गंभीर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:51 PM2023-10-31T12:51:27+5:302023-10-31T12:52:57+5:30
काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसमध्ये एकजूट आहे.
देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकांकडे विशेषत: सर्वांचे लक्ष लागले असून दोन्ही राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपात राजकीय डावपेच आखले जात आहेत. बड्या नेत्यांच्या सभांचेही नियोजन दिसून येते. तर. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान, भाजपा नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी काँग्रेसची तुलना हमास या दहशतवादी संघटनेशी केली आहे.
काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसमध्ये एकजूट आहे. आपण सगळे मिळून काम करू आणि भाजपाचा पराभव करू, ‘जनशक्ती’ जिंकेल, पैसा हरेल. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे, असे म्हणत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपावर निशाणा साधला होता. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमध्ये पातळी सोडून भाषेचा वापर होत आहे. भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी काँग्रेसची तुलना हमास या दहशतवादी संघटनेशी केली आहे. एवढंच नाही, त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोपही केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध पेटलं आहे. हमास ही दहशवादी संघटना असल्याने जगभरातील अनेक देशांनी त्यांना विरोध केला आहे. भारतानेही इस्रायलची बाजू घेत समर्थन केलं होतं. आता, याच हमासची तुलना काँग्रेससोबत करण्यात आली आहे. निवडणूक प्रचार आणि उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मध्य प्रदेशातील सतना येथे गेलेल्या खासदार मनोज तिवारी यांनी काँग्रेसवर टीका करताना हमाससोबत तुलना केली. काँग्रेस म्हणजे हमास, काँग्रेस म्हणजे दहशतवाद्यांची लांगनचालन करणारा, काँग्रेस म्हणजे सनातन धर्माला नष्ट करणारा पक्ष आहे. जनतेला आता हमासचे सरकार नको आहे, असे तिवारी यांनी म्हटले.
भाजपा लाडलीची काळजी करते, पण काँग्रेस फक्त लाडल्याची काळजी करते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता राहुल गांधींना लक्ष्य केलं. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यातील राज्यातील विधानसभेच्या सर्वच जागांसाठी मतदान होत आहे.