सत्ता आल्यास IPL मध्ये मध्य प्रदेशच्या संघाचा समावेश करू, वचनपत्रातून काँग्रेसचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 02:55 PM2023-10-17T14:55:20+5:302023-10-17T14:59:18+5:30
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये मिळालेल्या बंपर यशानंतर तोच फॉर्म्युला मध्य प्रदेशमध्येही वापरण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये मिळालेल्या बंपर यशानंतर तोच फॉर्म्युला मध्य प्रदेशमध्येही वापरण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मध्य प्रदेशसाठी काँग्रेसनं आज आपलं वचनपत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये पक्षाने शेतकरी, तरुण आणि महिलांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. मध्य प्रदेशमधील जनतेसाठी १०१ गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेस सत्तेत आली तर आयपीएलमध्ये मध्य प्रदेशचा संघ आणला जाईल. मुलींच्या विवाहासाठी १ लाख रुपयांची मदत करेल. तसेच राजस्थानप्रमाणे २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल. तसेच खेळाडूंसाठी पदक जिंका योजना आणली, जाईल, असं काँग्रेसने आपल्या वचनपत्रात म्हटले आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी वचनपत्र प्रसिद्ध करताना काँग्रेस येईल आणि सुखसमृद्धी घेऊन येईल, असं म्हटलं आहे. मला अनेक संघटना आणि सर्वसामान्यांकडून अनेक सल्ले मिळाले आहेत. पोस्टातूनही सल्ले आले आहेत. एकूण नऊ हजार जणांनी आपले अभिप्राय कळवले आहेत. आम्ही त्याच्या आधारावर आम्ही वचनपत्र तयार केलं आहे. तसेच सर्वसामान्य जनतेशी संबंधित ५९ मुद्दे आम्ही वचनपत्रामध्ये समाविष्ट केले आहेत.
काँग्रेसने या वचनपत्रामध्ये १२९० वचनं दिली आहेत. ७ वर्गांसाठी वेगवेगळी वचनपत्र तयार करण्यात आली आहेत. काँग्रेसने शेतकरी, महिला, तरुण यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
दरम्यान, वचनपत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, काँग्रेस आणि भाजपामध्ये कमलनाथ आणि शिवराज यांच्यामध्ये एकच फरक आहे तो म्हणजे शिवराज सिंह हवेत स्वप्नं दाखवतात आणि कमलनाथ हे ही स्वप्न जमिनीवर प्रत्यक्षात उतरवतात.