काँग्रेस सोडण्याच्या वावड्या; तरीही नकुलनाथवर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 09:13 AM2024-03-15T09:13:26+5:302024-03-15T09:14:50+5:30
काँग्रेसचा बालेकिल्ला; भाजपकडून जिल्हाध्यक्ष साहू यांना संधी, नकुलनाथ व त्यांच्या पत्नी यांच्याकडे एकूण ६६० कोटींची संपत्ती.
छिंदवाडा : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह त्यांचे पुत्र नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला होता. परंतु या केवळ चर्चाच राहत काँग्रेसने छिंदवाडा मतदारसंघातून नकुलनाथ यांना पुन्हा संधी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे त्यांच्याविरोधात भाजपने दुसऱ्या यादीत विवेक बंटी साहू यांना तिकीट दिले. विवेक साहू यांना यापूर्वी विधानसभा निवडणुकीत दोन वेळा कमलनाथ यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता साहू यांना कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचा सामना करावा लागणार आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडामध्ये भाजपला नेहमीच पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या साहू यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट कमलनाथ यांना आव्हान दिले.
नकुलनाथ सर्वांत श्रीमंत खासदार
२०१९ मध्ये मध्य प्रदेशमधील २९ पैकी २८ जागांवर भाजपने विजय मिळविला होता. मोदी लाट असतानाही छिंदवाड्यातून नकुलनाथ यांनी विजय मिळवत पक्षाची लाज राखली होती. नकुलनाथ यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ते देशातील सर्वात श्रीमंत खासदार ठरले होते. नकुलनाथ व त्यांच्या पत्नी यांच्याकडे एकूण ६६० कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दोन वेळा पराभव, पुन्हा संधी
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विवेक साहू यांनी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. सध्या ते भाजपचे छिंदवाडा जिल्हाध्यक्ष आहेत. २०१९ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून त्यांना २५ हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२३ मध्येही त्यांचा कमलनाथ यांनी ३७ हजार मतांनी पराभव केला होता.
लढत चर्चेत राहणार
सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या साहू हे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. परंतु नकुलनाथ यांची मतदारसंघातील सक्रियता आणि लोकांमधील दबदबा लक्षात घेता, ही लढत चर्चेत राहण्याची शक्यता आहे.