काँग्रेस मध्य प्रदेशात काढणार राम यात्रा, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारींनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 04:23 PM2024-02-24T16:23:06+5:302024-02-24T16:23:48+5:30
Jitu Patwari : हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही राम यात्रा काढून अयोध्येला दर्शनासाठी जाऊ, असे जितू पटवारी यांनी म्हटले आहे.
Jitu Patwari (Marathi News) रतलाम : अयोध्येतील राम मंदिराचा थेट परिणाम मध्य प्रदेशकाँग्रेसमध्ये दिसून येत आहे. कमलनाथ यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या जितू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली आता राम यात्रा काढण्यात येणार आहे. जितू पटवारी यांनी रतलाममध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही राम यात्रा काढून अयोध्येला दर्शनासाठी जाऊ, असे जितू पटवारी यांनी म्हटले आहे.
ज्यावेळी न्यायालयाचा निर्णय आला, त्यावेळी भाजपचे सरकार होते आणि मंदिरही त्यांच्याच कार्यकाळात बांधले गेले, त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर म्हणत असतील आज जा किंवा उद्या जा, तर कोणीही कोणाला हुकूम देऊ शकत नाही, असे म्हणत जितू पटवारी यांनी रामललाचे दर्शन घ्यायचे आहे. पुन्हा पुन्हा घ्यायचे आहे आणि लाख वेळा घ्यायचे असेल तर ते करू. कारण, हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे, असे सांगितले.
जितू पटवारी पुढे म्हणाले, आम्ही राम यात्रा काढून दर्शन घेऊ. जेव्हा मोदीजी म्हणतात...शिवराजजी म्हणतात...मोहन यादव म्हणतात तेव्हा आम्ही दर्शन का घेऊ? सवाल करत भाजपावरही निशाणा साधला. यापूर्वी जितू पटवारी यांनी कमलनाथ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावत कमलनाथ कुठेही जात नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, मी कमलनाथ यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितले की मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या हा कटाचा भाग आहे. ते काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसमध्येच राहणार आहेत. गांधी कुटुंबाशी त्यांचे नाते अतूट आहे. ते काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहेत आणि शेवटपर्यंत सोबत राहतील.
भारत जोडो न्याय यात्रा २ मार्चला मध्य प्रदेशात दाखल होणार
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पुढील महिन्यात २ मार्च रोजी मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रेची तयारी सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी बैठका घेऊन प्रत्येकावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवत आहेत. यात्रेसंदर्भात २३ वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ही यात्रा २ मार्च रोजी राजस्थानमधील ढोलपूर येथून मध्यप्रदेशातील मुरैना येथे दाखल होईल. मध्य प्रदेशात ही यात्रा पाच दिवस चालणार आहे. पाचव्या दिवशी यात्रा रतलामच्या सैलाना येथून राजस्थानच्या बारमेर जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करेल.