धीरेंद्र शास्त्रींसाठी स्पेशल विमान, स्वागताला माजी मुख्यमंत्री; आरतीही केली, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 10:33 AM2023-08-06T10:33:10+5:302023-08-06T11:06:32+5:30
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांचे सुपुत्र आणि छिंदवाडाचे खासदार नकुलनाथ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
छिंदवाडा - भक्तांवर करत असलेल्या अनोख्या उपायांमुळे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री वादात सापडले होते. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या विधानांमुळेही ते प्रकाशझोतात आले. सनातन धर्म वाढविण्याचं काम मी करतोय, असे म्हणत धीरेंद्र शास्त्रींनी अनेक ठिकाणी दरबार लावले आहेत. मुंबईतही त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता, मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी, ते विमानाने छिंदवाडा येथे पोहोचले.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांचे सुपुत्र आणि छिंदवाडाचे खासदार नकुलनाथ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे, धीरेंद्र शास्त्रींचे छिंदवाडा येथे आगमन होताच, त्यांच्या स्वागतासाठी ते एअरस्ट्रीप येथे हजर झाले होते. त्यानंतर, कमलनाथ यांनी शिकारपूरस्थीत निवासस्थानी त्यांचे स्वागत केले. यावेळी, कमनाथ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी धीरेद्र शास्त्रींची आरती करुन त्यांना नमस्कार केला. येथे ५ ते ७ ऑगस्ट दररोज सायंकाळी ४ वाजता धीरेंद्र शास्त्रींच्या रामकथेचं आयोजन करण्यात आलंय. कथेसाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांनी यावेळी भाषणा करताना, ४० वर्षांपूर्वीचा छिंदवाडा आणि आत्ताचा छिंदवाडा यात मोठा फरक असल्याचे म्हटले. तसेच, हा जिल्हा मध्य प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा असून येथील जनतेचं माझ्यावर प्रेम आणि विश्वास आहे. आपण, येथे येऊन जिल्ह्यातील नागरिकांचा सन्मान केला, यापुढेही छिंदवाडा जिल्ह्याला सातत्याने यावे, असे आवाहनही कमलनाथ यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना केले.
सिमरिया येथील हनुमान मंदिरात आपण रामकथेचं आयोजन करावं, असे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार, मी इथे आलो आहे, येथे यापुढेही येणार. आजची रामकथा आदिवासी बंधु-भगिंनींच्या सन्मानार्थ असल्याचंही धीरेंद्र शास्त्रींनी यावेळी म्हटलं.