Election Result 2023 : कर्ज काढून निवडणूक लढली अन् झाला आमदार; भाजपा-काँग्रेस उमेदवाराचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 12:48 PM2023-12-04T12:48:11+5:302023-12-04T12:49:13+5:30
madhya pradesh election 2023 : मध्य प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं.
Sailana Results 2023 : मध्य प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने नेत्रदीपक कामगिरी केली. खरं तर भाजपाने राज्यात सत्ता मिळवली असली तरी भाजपाच्या काही तगड्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. अशातच मध्य प्रदेशातील सैलाना विधानसभा मतदारसंघातील जागेनं सर्वांचं लक्ष वेधलं. इथं कर्ज काढून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारानं भाजपा आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून आमदार होण्याचा मान पटकावला.
दरम्यान, सैलाना विधानसभा मतदारसंघात भारत आदिवासी पक्षाचे कमलेश्वर डोडियार विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या हर्ष विजय गेहलोत यांचा ४ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. या जागेवर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कमलेश्वर यांची कहाणी फार गमतीशीर तितकीच संघर्षमय आहे. त्यांनी कर्ज घेऊन ही निवडणूक लढवली अन् राजकीय पंडितांचा पोल खोटा ठरवला. काँग्रेस उमेदवाराचा ४,६१८ मतांनी पराभव करून कमलेश्वर यांनी सर्वांना धक्का दिला.
कर्ज काढलं अन् झाला आमदार
भारतीय आदिवासी पक्षाकडून निवडणूक लढलेल्या कमलेश्वर डोडियार यांना एकूण ७१,२१९ मतं मिळाली. तर काँग्रेसचे हर्ष विजय गेहलोत ६६,६०१ मतांसह दुसऱ्या आणि भाजपाच्या संगीता चोरेल ४१,५८४ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिल्या. सैलाना हा मतदारसंघ राजस्थानच्या सीमेला लागून आहे. लक्षणीय बाब म्हणजे कर्ज काढून निवडणूक लढवली आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारालाही पराभूत केल्यामुळे कमलेश्वर प्रसिद्धीच्या झोतात आले. आता हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. कमलेश्वर यांनी निवडणुकीत १२ लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. निवडणुकीत खर्च होणारा सगळा पैसा कर्ज काढून गोळा केला, असेही त्यांनी सांगितले.