कमलनाथ यांचा मोबाईल हॅक, काँग्रेस नेत्यांना फोन करून मागितले प्रत्येकी 10 लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:34 AM2023-07-13T10:34:03+5:302023-07-13T11:31:49+5:30
हे दोन्ही हॅकर्स गुजरातचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांचा मोबाईल हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हॅकर्सनी त्यांचा मोबाईल हॅक केला आणि त्यांच्या नंबरवरून काही काँग्रेस नेत्यांना फोन केला. यावेळी या हॅकर्सनी त्यांच्या नंबरवरून कॉल करून इतर काँग्रेस नेत्यांकडे प्रत्येकी 10 लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी गुन्हे शाखेकडे तक्रार केली आली असता दोन हॅकर्सना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही हॅकर्स गुजरातचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हॅकर्सनी कमलनाथ यांचा मोबाईल नंबर हॅक केला होता. यानंतर त्यांनी गोविंद गोयल, आमदार सतीश सिरकरवार, इंदूर जिल्हाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष अशोक सिंह यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांना कॉल केला. तसेच, या हॅकर्सनी कमलनाथ यांच्या नावाने या नेत्यांकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मागणी केली. नेत्यांना संशय आल्यावर त्यांनी कमलनाथ यांच्याशी अन्य नंबरवर संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला.
या नेत्यांनी पैशांच्या मागणीला दुजोरा दिला असता, हे हॅकर्सचे काम असल्याचे आढळून आले. अशी कोणतीही मागणी कमलनाथ यांनी केलेली नाही. त्याची माहिती गुन्हे शाखेला देण्यात आली. त्यानंतर हॅकर्सना पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून सापळा रचण्यात आला. हॅकर्सना पकडण्यासाठी गोविंद गोयल यांच्या बंगल्यावर पैसे देण्याच्या नावाखाली बोलावण्यात आले. ज्यावेळी दोन्ही हॅकर्स पैसे घेण्यासाठी गोविंद गोयल यांच्या बंगल्यावर आले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
दरम्यान, दोन्ही आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या हे दोन्ही हॅकर्स गुजरातचे रहिवासी असून ते काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, कमलनाथ हे मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते.