मध्य प्रदेशात काँग्रेसने सपासाठी सोडली नाही एकही जागा, अखिलेश यादव संतप्त, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:21 PM2023-10-19T17:21:48+5:302023-10-19T17:22:32+5:30
Madhya Pradesh Assembly Election: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद तीव्र झाले आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासाठी एकही जागा न सोडल्याने अखिलेश यादव संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद तीव्र झाले आहे. काँग्रेसनेमध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासाठी एकही जागा न सोडल्याने अखिलेश यादव संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेत अखिलेश यादव यांनी सांगितले की, इंडिया आघाडी ही केवळ राष्ट्रीय पातळीवर आहे. राज्यस्तरावर नाही, ही माहिती आम्हाला आधी नव्हती.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, ‘इंडिया’मध्ये विधानसभा स्तरावर कुठलीही आघाडी नसेल हे आधी माहिती असतं तर आमचे नेते काँग्रेसला भेटायला गेले नसते. तसेच त्यांना उमेदवारांची यादीही दिली नसती. आघाडी केवळ उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीत असेल तर त्यावर विचार केला जाईल.
मध्य प्रदेशमध्ये आमचे उमेदवार कधी कधी आणि कुठे कुठे जिंकले होते, कुठल्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते, हे आम्ही काँग्रेसला स्पष्टपणे सांगितले होते. मात्र जेव्हा उमेदवारांची यादी आली, तेव्हा त्यात काँग्रेसने आधीच सारं जाहीर करून टाकलं होतं.
अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांना सपाच्या नेत्यांना रात्री १ वाजेपर्यंत बसवून ठेवलं. तसेच काँग्रेस सपासाठी सहा जागांवर विचार करेल असं सांगितलं. मात्र जेव्हा उमेदवारांची यादी समोर आली, तेव्हा त्यामध्ये सपाच्या एकाही उमेदवाराला जागा सोडण्यात आली नव्हती. दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.