कमलनाथ यांना डच्चू, नव्या नेतृत्वाला संधी, पाहा कोण आहेत मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 23:19 IST2023-12-16T23:17:53+5:302023-12-16T23:19:03+5:30
Jitu Patwari : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आपल्या नेतृत्वात मोठे फेरबदल केले आहेत.

कमलनाथ यांना डच्चू, नव्या नेतृत्वाला संधी, पाहा कोण आहेत मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसनेमध्य प्रदेशमधील आपल्या नेतृत्वात मोठे फेरबदल केले आहेत. निवडणुकीतील पराभवाला काही दिवस उलटल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले असून, जितू पटवारी यांची काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेसच्या अध्यक्षांनी जितू पटवारी यांना तत्काळ प्रभावाने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.
जितू पटवारी यांच्या नियुक्तीमुळे आता काँग्रेस नेतृत्वाकडून राज्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. १९ नोव्हेंबर १९७३ रोजी इंदूरजवळील बिजलपूर येथे जन्मलेल्या जितू पटवारी यांनी बीए, एलएलबीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांचे आजोबा कोदरलाल पटवारी हे स्वातंत्र आंदोलनात सहभागी झाले होते. तर जितू पटवारी यांचे वडील रमेशचंद्र पटवारी हेसुद्धा काँग्रेसमध्ये सक्रिय होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जितू पटवारी यांना राऊ विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवाराकडून तब्बल ३५ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले होते. मात्र त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने मोठा डाव खेळला आहे. २०१८ मध्ये १५ वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये पटवारी यांनी उच्चशिक्षण, क्रीडा आणि युवककल्याण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.