शिंदेंना 'दे धक्का'... १२०० गाड्यांचा ताफा घेऊन भाजपा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 07:11 PM2023-08-19T19:11:53+5:302023-08-19T19:13:35+5:30
काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे.
भोपाळ - छत्तीसगड व मध्य प्रदेशमध्ये हार पत्करावी लागलेल्या जागांवर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसतानाही छत्तीसगडसाठी २१ व मध्य प्रदेशसाठी ३९ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत भाजपात गेलेल्या काँग्रेस शिलेदाराने घरवापसी केली आहे. त्यामुळे, भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.
काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. तर, इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपला रोखण्याचा डावही काँग्रेसकडून आखला जात आहे. त्याच पार्श्वभूमिवर अगोदर होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. मध्य प्रदेशमधील आमदार समंदर पटेल यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा हात पकडला आहे. २०१८ मध्ये काँग्रेसच्या जनमताचे सरकार मध्य प्रदेशमध्ये आले होते. मात्र, शिवराज सिंह यांनी आमदारांची खरेदी करुन धनशक्तीचं सरकार बनवलं, असा आरोप समंदर पटेल यांनी काँग्रेस पक्षात परत येताच केला आहे.
समंदर पटेल यांच्यारुपाने ज्योतिर्रादित्य शिंदेंना मोठा झटका बसला आहे. येथील नीमच जिल्ह्याच्या जावद येथील ते नेते आहेत. कमलनाथ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे १२०० गाड्यांचा ताफा घेऊन आपल्या समर्थकांसह समंदर पटेल भोपाळला भाजपच्या कार्यालयात पोहोचले होते. तेथे आपला भाजपाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यापूर्वी २०२० मध्ये ते ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत भाजपमध्ये गेले होते. समंदर पटेल यांना ज्योतिर्रादित्य शिंदेंचा लेफ्टीनंट मानले जात. त्यामुळे, कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील सरकार कोसळले. आता, सत्ताधारी भाजपात आपली घुसमट होत असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
समंदर पटेल हे शिंदेंचे तिसरे विश्वासू आहेत, जे पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. १४ जून रोजी शिवपुरीचे भाजपा नेते बैजनाथ सिंह यादव यांनी शिंदेंपासून फारकत घेत काँग्रेसमध्ये वापसी केली. ७०० गाड्यांचा ताफा घेऊन तेही आले होते. तर, भाजपाचे माजी शिवपुरी जिल्हा उपाध्यक्ष राकेश कुमार गुप्ता यांनीही २६ जून रोजी काँग्रेसमध्ये वापसी केली होती.
भाजपाकडून निवडणुकांची तयारी
मध्य प्रदेशमधील विधानसभा जागांसाठी भाजपने वर्गवारी केली आहे. हमखास विजय मिळणाऱ्या जागा अ गटात, कधी हार तर कधी विजय मिळणाऱ्या जागा ब गटात, दोनपेक्षा अधिक वेळा पराभव झालेल्या जागा क गटात, नेहमीच हार पत्कराव्या लागणाऱ्या जागा ड गटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, भाजपाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. तसेच, या जागांसाठी योग्य उमेदवार निवडण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी, देवेंद्र फडणवीसांसह काही मराठी नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.