मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, कमलनाथ विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:38 AM2023-10-02T11:38:36+5:302023-10-02T11:47:38+5:30
या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या कमलनाथ हे मध्य प्रदेशकाँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरतील, असे म्हटले जात होते, परंतु त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांनी मात्र राज्य निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कमलनाथ यांना विधानसभा निवडणूक लढवून फक्त छिंदवाडामध्येच वेळ घालवायचा नाही. कमलनाथ हेच राज्यातील काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा आहेत, असे म्हटले जात होते. शनिवारच्या रॅलीत राहुल गांधी यांनी कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले होते.
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, प्रचाराची संपूर्ण जबाबदारी केवळ कमलनाथ यांच्या खांद्यावर आली आहे. कमलनाथ यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत उमेदवारांबाबत चर्चा केली. उमेदवारांची निवड झाली असून यादी जाहीर होण्यास अजून वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत संबंधित उमेदवारालाही कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्य विधानसभा निवडणुकीत कमलनाथ जोरदार सक्रिय दिसत आहेत. राज्यात ते सुरुवातीपासूनच पक्षाचे नेतृत्व करत आहेत. पक्षाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही कार्यक्रमही आयोजित केले. तेव्हापासून कमलनाथ हे काँग्रेसचा चेहरा असतील असे समजले होते. मात्र, निवडणूक न लढवण्याचा निर्णय खुद्द कमलनाथ यांचा आहे की काँग्रेस पक्षाचा, याबाबत सध्या काहीही स्पष्ट झाले नाही.