मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक! सरकार येताच श्रीलंकेत सीता मंदिर बांधणार; कमलनाथ यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 07:34 PM2023-10-25T19:34:31+5:302023-10-25T19:35:15+5:30
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस करत आहेत.
Kamal Nath Promises for MP Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस करत आहेत. विविध कामांचे आश्वासन देऊन जनतेला आकर्षित करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी मैदानात आहे. २०२३च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ दररोज जनतेसमोर आश्वासनांची यादी वाचत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळत काँग्रेसचे सरकार आल्यास श्रीलंकेतील सीता माता मंदिराच्या उभारणीची योजना पुन्हा सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले.
खरं तर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील मागील कॉंग्रेस सरकारने श्रीलंकेत माता सीतेचे मंदिर बांधण्याची योजना आखली होती, परंतु ते सुरू होण्यापूर्वीच राज्यातील सत्तेतून कॉंग्रेस पायउतार झाली. सत्ताबदल होताच योजनेला ब्रेक लागला. त्यामुळे आता सरकार परत येताच श्रीलंकेतील सीता माता मंदिराच्या उभारणीचा प्रकल्प पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन कमलनाथ यांनी पुन्हा दिले आहे.
कॉंग्रेसची मोठी आश्वासने
विजयादशमीच्या निमित्ताने कमलनाथ यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली. कोणताही भाविक देवाच्या दर्शनापासून वंचित राहू नये यासाठी मंदिरांमधील दर्शनासाठी असलेली तिकीट व्यवस्था हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय भगवान परशुरामांचे जन्मस्थान असलेल्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. एवढेच नाही तर अस्थिकलशाचे विसर्जन आणि कुटुंबीयांच्या अंत्यसंस्कारासाठी दहा हजार रुपयांची मदत दिली जाईल, असा दावा त्यांनी केला.
तसेच पुजारी आणि महंतांचा विमा काढला जाईल. महाकाल आणि ओंकारेश्वर मंदिरात सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाईल. श्रद्धास्थानांची देखभाल आणि त्यांच्याशी संबंधित पुजारी आणि सेवकांचे जीवनमान लक्षात घेऊन आम्ही प्रचलित नियमांमध्ये सुधारणा करू. रेवा येथे संत कबीर पीठ आणि मुरैना येथे संत रविदास पीठ बांधून देऊ, असेही कमलनाथ यांनी आश्वासन देताना सांगितले.