विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला तडे? आता नितीश कुमारांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 07:54 PM2023-10-24T19:54:17+5:302023-10-24T19:54:51+5:30
Madhya Assembly Election 2023: मध्य प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची राजकीय पक्षांची पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे.
मध्य प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची राजकीय पक्षांची पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिय आघाडीला आपलं ऐक्य दाखवण्याची संधी होती. मात्र ऐक्याचे हे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. एकीकडे मध्य प्रदेशमधील जागावाटपावरून समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाले असतानाच आता नितीश कुमार यांनीही मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नितीश कुमार यांनी मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारांची आधीच घोषणा केलेली आहे. त्यामुळे येथे काँग्रेस आणि जेडीयू आमने-सामने येणार आहेत. एकीकडे विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करत असलेल्या नितीश कुमार यांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने मध्य प्रदेशमधील पिछौर, राजनगर, विजय राघवगड, थांदला आणि पेटलावद विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारांची आधीच घोषणा केलेली आहे. मात्र येथे काँग्रेस आपले उमेदवार बदलणार असल्याची चर्चा आहे. तरीही जनता दल युनायटेडने येथून उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये काहीच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.