MP मध्ये 'मामां'चीच 'भुरळ', राज्यात पुन्हा फुलणार भाजपचं कमळ? ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला झटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 09:50 PM2023-09-14T21:50:08+5:302023-09-14T21:54:10+5:30
एक ओपिनियन पोलही समोर आला आहे. यात काँग्रेसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेतून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
मध्य प्रदेशात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने गेल्या महिन्यातच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच आता एक ओपिनियन पोलही समोर आला आहे. यात काँग्रेसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेतून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार? -
आयएएनएस-पोलस्ट्रॅटने मध्य प्रदेसातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत एकूण 7,883 लोकांनी आपली मतं नोंदवली आहेत. सर्व्हेनुसार, आगामी निवडणुकीत भाजपला 120 जागा मिळू शकतात. अर्थात, सर्व्हेतील हा आकडा खरा ठरला, तर भाजप विजयासाठी आवश्यक असलेला आकडा (116) पार करून, पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सरकार स्थापन करू शकते. या सर्व्हेत, भाजपला किमान 116 ते 124 जागा मिळू शकतात. तसेच, काँग्रेसच्या पारड्यात 104 जागा जाण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.
मामांची भुरळ अथवा जादू कायम -
या सर्व्हेत एमपीतील लोकांना सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यासंदर्भात विचारण्यात आले, यावर तब्बल 40 टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान हे आपले फेव्हरिट नेते असल्याचे सांगितले. तर 35 टक्के लोकांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते कमलनाथ यांचे नाव सांगितले. अर्थात या सर्व्हेनुसार राज्यात मामांचीच भुरळ अथवा जादू कायम आहे. तसेच यात 47 टक्के लोकांनी सीएम शिवराज यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तर 24 टक्के लोकांनी त्यांचे काम सर्वसाधारण असल्याचे म्हटले आहे. तर 29 टक्के लोकांनी मामाच काम खराब असल्याचे म्हटले आहे.