भाजप नेत्याचं स्वागत करणं काँग्रेस नेत्यांना पडलं महागात, पक्षाकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:34 PM2024-07-29T15:34:31+5:302024-07-29T15:47:31+5:30
मध्य प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचं स्वागत केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर पक्षानं कारवाई केली आहे.
मध्य प्रदेशात एका भाजप नेत्याचे स्वागत करणं काँग्रेसच्या नेत्यांना चांगलच महागात पडलं आहे. मध्य प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचं स्वागत केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर पक्षानं कारवाई केली आहे. याप्रकरणी इंदूरच्या काँग्रेस शहर आणि ग्रामीण अध्यक्षांना पक्षानं निलंबित केलं आहे. तसंच, संघटन प्रभारी राजीव सिंह यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरजीत चढ्ढा आणि ग्रामीण अध्यक्ष सदाशिव यादव यांना नोटीस बजावून ७ दिवसांत खुलासा मागवला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष आणि संघटन प्रभारी यांनी नोटीसमध्ये लिहिलं आहे की, एक असा व्यक्ती, ज्यानं माता अहिल्याच्या नगरीत लोकशाही मूल्यांची हत्या केलीय. इंदूरच्या जनतेकडून मतदानाचा हक्क काढून घेऊन त्यांनी इंदूरची देश-विदेशात बदनामी केली, ज्याचा इंदूरच्या जनतेनं निषेधही केला. अशा व्यक्तीचं इंदूर जिल्हा काँग्रेस कमिटी गांधी भवनात स्वागत करणं, हे अनुशासनहीनतेच्या श्रेणीत येतं. तुम्ही तुमचं स्पष्टीकरण सात दिवसांत द्या. या कालावधीत तुम्हाला तुमच्या सध्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, अलीकडेच एक पेड माँ के नाम मोहिमेत काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी मंत्री कैलाश विजयवर्गीय आणि इतर भाजप नेते इंदूरमधील जिल्हा काँग्रेस कार्यालयात गेले होते. यावेळी काँग्रेस कार्यालयात कैलाश विजयवर्गीय यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच, त्यांना मिठाई सुद्धा भरवण्यात आली होती. दरम्यान, याबाबत काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता याप्रकरणी काँग्रेस ग्रामीण व शहराध्यक्षांना निलंबित करण्यात आलं आहे.
विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं होतं
लोकसभा निवडणुकीच्यावेळी कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं होतं. तसंच, 'इंदूरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचं भाजपमध्ये स्वागत आहे,' अशी एक्सवर पोस्ट कैलाश विजयवर्गीय यांनी केली होती. दरम्यान, अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळं इंदूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एकही उमेदवार लोकसभा निवडणूक लढवू शकला नाही. त्यामुळं भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी यांना ऐतिहासिक विजय मिळाला.