तीन केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदार रिंगणात, काँग्रेसचं आव्हान मोडण्यासाठी भाजपानं आखला असा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:20 AM2023-09-26T10:20:59+5:302023-09-26T10:21:29+5:30
Madhya Pradesh Assembly Election: यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ३९ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पक्षाने मोठा प्रयोग करताना ३ केंद्रीय मंत्र्यांसह एकूण ७ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ३९ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पक्षाने मोठा प्रयोग करताना ३ केंद्रीय मंत्र्यांसह एकूण ७ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मातब्बर केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट देऊन भाजपानेकाँग्रेसकडून मिळणाऱ्या कडव्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांपैकी अनेकजण आपापल्या मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवत आलेले आहेत. तसेच त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे अनेक अर्थ निघत आहेत.
भाजपाने आपल्या दुसऱ्या उमेदवारी यादीमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दिमनी येथून, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना नरसिंहपूर येथून, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना निवास येथून, खासदार गणेश सिंह यांना सतना येथून, खासदार रीती पाठक यांना सीधी येथून, राकेश सिंह यांना जबलपूर पश्चिम येथून आणि खासदार उदय प्रताप सिंह यांना गाडरवारा येथून उमेदवारी दिली आहे.
भाजपाने काल प्रसिद्ध केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीमध्ये केवळ ३ ठिकाणी भाजपाचे आमदार होते. मागच्या निवडणुकीत सीधी, नरसिंहपूर आणि मेहर येथे भाजपाला विजय मिळाला होता. तर ३६ जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र भाजपाने आपल्या तिन्ही विद्यमान आमदारांना तिकीट दिलेलं नाही. नारायण त्रिपाठी यांचं तिकीट पक्षविरोधी विधानांमुळे कापण्यात आलं. तर आदिवासी व्यक्तीवर केलेल्या मुत्रविसर्जनामुळे केदार शुक्ल यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तर नरसिंहपूर येथून जालम पटेल यांच्या जागी त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रल्हाद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंह कुलस्ते यांच्यासह एकूण सात खासदारांना उमेदवारी दिली आहे. या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं कारण म्हणजे त्यांचं त्या त्या भागामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व आहे. यामधील बहुतांश नेते आपल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने विजयी होत आलेले आहेत. त्यामुळे या नेत्यांनी निवडणूक लढवल्यास त्याचा प्रभाव आजूबाजूच्या मतदारसंघांवरही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते.
उमेदवारांच्या दुसऱ्या यादीबरोबरच भाजपाने मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी ७८ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात प्रस्तावित आहेत.