गाशा गुंडाळा आणि बॉलिवूडमध्ये जा, ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 02:57 PM2023-09-10T14:57:12+5:302023-09-10T14:59:10+5:30
Jyotiraditya Scindia: राज्यात आपल्या पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास राज्यात आयफा अवार्ड सोहळा आयोजित करण्याची घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेवरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राज्यात आपल्या पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास राज्यात आयफा अवार्ड सोहळा आयोजित करण्याची घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेवरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचा हा काय विचार आहे. भाजपा महिला, शेतकरी, मजूर आणि तरुणांना पुढे घेऊन जात आहे. तर मध्य प्रदेश काँग्रेसने २०१८ मध्येसुद्धा आयफा अवार्डवर आपलं लक्ष्य केंद्रित केलं होतं. आता सरकार आल्यास पुन्हा हा सोहळा आयोजित करू असं सांगत आहेत.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान काँग्रेसकडून होत असलेले हल्ले आणि काँग्रेसच्या आंदोलनाबाबत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, काँग्रेसबाबत आम्ही जेवढं कमी बोलू तेवढं चांगलं ठरेल.जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पोस्टर लावणे. घोषणाबाजी करणे, असली नाटकं काँग्रेसकडून सुरू आहेत. कमलनाथ म्हणतात निवडणुका हा लोकशाहीमधील एक उत्सव आहे. तर उत्सवामध्ये कुणी दगडफेक करतं का? असा सवालही शिंदे यांनी विचारला.
काँग्रेस सध्या पोस्टर लावणे, जेलभरो करणे, असली कामं करत आहे. तुम्ही तुमची कामं करा, तुम्हाला कुणी अडवलंय. आपली रेषा लांब ओढायची नाही तर दुसऱ्याची रेषा लहान करायची, हीच काँग्रेसची विचारसरणी राहिली आहे. आता काँग्रेस शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बहन योजनेची कॉपी करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी काँग्रेस नेत्यांकडून सनातन धर्मावर करण्यात येत असलेल्या टिकेलाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसकडे आता केवळ एकच काम उरलं आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा. सनातन धर्माला नष्ट करा हाच काँग्रेसचा विचार आणि विचारसरणी राहिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.