"३० आमदारांचा मला पाठिंबा..."; काँग्रेस आमदारानं थेट हायकमांडला लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:29 AM2023-07-21T11:29:43+5:302023-07-21T11:30:31+5:30

विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी त्यांच्या सहकारी ८ आमदारांसह राज्य सरकारला पाठिंबा दिला

"30 MLAs support me..."; The Congress MLA Sangram Thopate wrote a letter directly to the Congress President | "३० आमदारांचा मला पाठिंबा..."; काँग्रेस आमदारानं थेट हायकमांडला लिहिलं पत्र

"३० आमदारांचा मला पाठिंबा..."; काँग्रेस आमदारानं थेट हायकमांडला लिहिलं पत्र

googlenewsNext

मुंबई – राज्यातील राजकारणात गेल्या ४ वर्षापासून अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांनी बंड करत उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्याकडून पक्षच घेण्याची चाल आखली. गेल्या वर्षभरात शिवसेना-राष्ट्रवादी फुटल्याने विधानसभेत आमदारांचे संख्याबळ घटले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे.

विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु काँग्रेस पक्षातच विरोधी पक्षनेतेपदावरून चुरस निर्माण झाली आहे. त्यात आता काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी थेट दिल्लीला पत्र पाठवल्याचे समोर आले आहे. या पत्रात ३० आमदारांचा मला पाठिंबा असल्याचे थोपटे यांनी दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यानंतर गेल्या २ दिवसांपासून काँग्रेस दुसऱ्या फळीतील नेतृत्व पुढे आणण्याची शक्यता असल्याचे बोलले गेले. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.

संग्राम थोपटे यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असून मी विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज विधानसभेत बैठक होणार आहे. त्यामुळे आज या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी संग्राम थोपटे यांनी पाठवलेल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काय निर्णय घेणार हेदेखील पाहावे लागणार आहे असं वृत्त एबीपीने दिले आहे.

याआधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी त्यांच्या सहकारी ८ आमदारांसह राज्य सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाच शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांची सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत २ गट पडले. त्यात शरद पवारांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या घटली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटले. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला.

Web Title: "30 MLAs support me..."; The Congress MLA Sangram Thopate wrote a letter directly to the Congress President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.