जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:01 PM2019-02-05T19:01:39+5:302019-02-05T19:06:35+5:30
राज्यातील सर्व दिग्गज नेतेमंडळींना सभांमध्ये सहभागी होण्याविषयीही कळवण्यात आले आहे.
पुणे : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच राज्यात ५० जाहीर सभा घेण्याचा निर्णय काँग्रेसच्या प्रदेश समितीने घेतला आहे. पुण्यातूनच याची सुरूवात होणार असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ८ फेब्रुवारीला ही सभा घेणार आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी म्हणून काँग्रेसने काही महिन्यापूर्वी जनसंघर्ष यात्रा काढली. आता या सभा जनसंघर्ष सभा या नावाने घेण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख शहरांना तसेच जिल्हा शाखांना सभांच्या नियोजनाविषयी कळवण्यात आले आहे. जनसंघर्ष यात्रेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच शहरी भागांमध्ये ही यात्रे नेता आली नाही. त्यामुळे शहरी भागांसाठी संघर्ष सभांचे आयोजन केले आहे.
वातावरणनिर्मिती हाच या सभांचा मुख्य उद्देश आहे. स्वत: प्रदेशाध्यक्षांनी त्याचे नियोजन केले आहे. सभेमध्ये राज्य तसेच केंद्र सरकारचे जनहितविरोधी धोरण जनतेला समजावून सांगण्यात येईल. त्यासाठी वक्त्यांनी या विषयाचा अभ्यास करावा, स्थानिक नेतृत्वानेही याविषयी आपले मते प्रभावीपणे व्यक्त करावीत अशा सूचना दिल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारचे सत्ता राबवतानाचे अपयश या सभांमधून प्रामुख्याने जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर बोलण्यासाठी म्हणून त्याच प्रकारचे विषय दिले आहेत.
इच्छुक उमेदवारांवर या सभांची जबाबदारी दिली आहे. शहर, जिल्हा शाखेने त्यांना साह्य करावे असे सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व दिग्गज नेतेमंडळींना सभांमध्ये सहभागी होण्याविषयीही कळवण्यात आले आहे. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोघे माजी मुख्यमंत्री त्यात असतीलच शिवाय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व पक्षाचे राज्य स्तरावरील अन्य नेतेही सभांमध्ये सहभागी होतील असे नियोजन करण्यात येत आहे. पुण्यातील सभा ८ फेब्रुवारीला भवानी पेठेतील महापालिकेच्या पेस्तनजी शाळेजवळ सायंकाळी ५ वाजता होणार आहे.