विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 05:38 AM2024-11-30T05:38:05+5:302024-11-30T05:38:31+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विधानसभा सदस्य बनलेल्या आमदारांची संख्या ७८ इतकी आहे. या नवीन ७८ चेहऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३३, शिवसेनेचे १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, उद्धव ठाकरे गटाचे १० तर काँग्रेस ६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ नवीन चेहरे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. त्याशिवाय छोट्या पक्षाचे २ आमदार हेदेखील प्रथमच विधानसभेत पोहचले आहेत. यात ७८ आमदारांमध्ये एका अपक्ष आमदाराचाही समावेश आहे.
मुंबईत ९ जागांवर नवीन चेहरे
यंदाच्या विधानसभेत मुंबईतील ३६ पैकी ९ जागांवर पहिल्यांदाच निवडणूक लढवून आमदार झालेले चेहरे आहेत. त्यात उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत, वरूण सरदेसाई, हारून खान, मनोज जामसुतकर यांचा समावेश आहे. महेश सावंत यांनी माहीम मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव करून आमदार बनले आहेत तर वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरूण सरदेसाई यांनी महायुतीमधील राष्ट्रवादीचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांचा पराभव केला.
तसेच बोरिवलीतून भाजपाचे संजय उपाध्याय, अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल, अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक, धारावीतून ज्योती गायकवाड यासारखेही चेहरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून सभागृहात पोहचले आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनीही भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवली. त्यादेखील पहिल्यांदाच विधानसभा सभागृहात दिसणार आहे. अपक्ष आमदारांमध्ये शिवाजी पाटील हेही पहिल्यांदा निवडून आलेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून स्व. आर.आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हेही आमदार झाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालात भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकून राज्यात नंबर वनचा पक्ष बनला आहे. त्यानंतर शिवसेना ५७, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय पटकावला. मविआत ठाकरे गटाला सर्वाधिक २० जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेस १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १० जागांवर विजय मिळाला आहे.